कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बुधवारी (१४ ऑगस्ट) रात्री देशभरात अनेक ठिकाणी ‘रिक्लेम द नाइट’ नावाने निदर्शने सुरु झाली. मात्र, कोलकाता येथे आयोजित आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्री संतप्त जमावाने बॅरिकेड तोडून रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीत प्रवेश करून अज्ञातांकडून रुग्णालयाची तोडफोड केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड केली. डॉक्टरांना देखील मारहाण केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी रुग्णालयातील खुर्च्या तोडल्या, पंखे तोडले. खिडक्या, पलंगापासून सर्व वैद्यकीय उपकरणे देखील नष्ट केली आहेत. रुग्णालयाच्या आत बांधलेली पोलिस बॅरेकही जमावाने उद्ध्वस्त केली.
न्यायाच्या मागणीसाठी प्रथम रुग्णालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली आणि नंतर काही वेळातच हजारो लोक जमा झाले. यानंतर या जमावाने अचानक हॉस्पिटलवर हल्ला केला. त्या आपत्कालीन इमारतीवर हल्ला करण्यात आला, ज्या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान काही पोलीस जखमीही झाले आहेत.
हे ही वाचा..
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध
पवारांनी वाटोळे केले ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…
विभाजन विभिषिका दिवस: फाळणीने हिंदूंना दिलेल्या वेदनेची एक कहाणी
कोलकाता पोलिसांनी सांगितले की, काही अज्ञात हल्लेखोरांनी आरजी कार मेडिकल कॉलेजची तोडफोड केली. आंदोलकांमध्ये सुमारे ४० जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच लोकांनी रुग्णालयात हिंसाचार केला. या काळात पोलिसांच्या वाहनांचे आणि काही दुचाकींचेही नुकसान झाले.
भाजपने या हल्ल्याचा निषेध करत टीएमसीवर आरोप केला आहे. टीएमसीने रुग्णालयावर हल्ला चढवण्यासाठी गुंडांना पाठवल्याचे भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे.