कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकलने प्रवास करु देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आलीय. कोविडचे सर्व नियम (मास्क वगैरे) पाळून लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकलने प्रवास करु देण्यास काहीच हरकत नाही, पण कोविड सुसंगत अनुपालनात सुरक्षित अंतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुंबईच्या गर्दीत शक्य होणार नाही.
सध्या मुंबई महानगर प्रदेशात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या अनलॉक काळात टप्प्याटप्प्याने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. यावर्षी अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. लॉकडाऊन काळात जेव्हा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवेची परवानगी होती, तेव्हा अनेकांनी बनावट पास किंवा ओळखपत्रे बनवून प्रवास केला, त्यांना रेल्वे पोलिसांनी पकडून दंड केल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या. गेल्या आठवड्यात असाच प्रवास केल्यावर पकडलेल्या कल्याणच्या एका तरुणाचा एक व्हिडिओही व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय झाला होता.
मुंबईत लोकलचा प्रवास कामावर जाणाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. लोकलशिवाय अन्य कोणतंही प्रवासाचं साधन आर्थिक तसंच वेळेच्या दृष्टीने परवडणारं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि अत्यावश्यक सेवेत नसलेल्यांना लोकल प्रवासाची अनुमती द्यावी अशी मागणी पुढे आलीय.
हे ही वाचा:
अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात बोलणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करा
ठाकरे सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करतंय
दिनो मोरिया मुंबई महापालिकेतील सचिन वाझे
कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही नगण्य असली तरी असतेच. कारण मुंबईतील लोकल प्रवासाच्या गर्दीत सुरक्षित शारिरीक अंतर पाळणं कुणालाच शक्य होणार नाही. कारण गर्दी वाढली की कोरोनाचा संसर्ग वाढणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. अशा वेळी लसीकरण हे एकमेव सिद्ध झालेलं शस्त्र आपल्याकडे आहे. त्यातही काही त्रुटी असल्या तरी आपल्याला सध्या तरी लसीकरणाचा निकष हा महत्वाचा मानायलाच हवा.