सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाला जायचे तर दोन डोस घ्या

सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाला जायचे तर दोन डोस घ्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरू लागल्यावर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली. मात्र यंदाही राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर विसर्जन करण्यासाठी दोन डोस घेतलेल्या १० जणांनाच परवानगी देण्यात येईल, असा नियम केल्यामुळे गणेशभक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

पालिकेच्या या निर्णयावरून विसर्जनस्थळी अधिकच गोंधळ उडण्याची शक्यता आहे. ही परवानगी केवळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठीच लागू आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या १० जणांना परवानगी असल्यामुळे अशा गणेशभक्तांची तपासणी नेमकी कशी केली जाईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, प्रत्येक गणेशोत्सव मंडळासोबत १० जणच आहेत की नाही, याची तपासणी कशी होणार? लसीचा एक डोस घेतलेल्यांना किंवा लस न घेतलेल्यांना गर्दीत बसने प्रवास करण्याची मुभा आहे, पण रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी नाही. रेल्वे प्रवासाठीही पासची सक्ती केली जात आहे. आणि आता त्यात विसर्जनासाठी दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगीच्या नव्या नियमाची भर पडली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे नियम लावल्यामुळे लोकांमध्ये अजूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनाला परवानगी देण्यात आली नव्हती. गणेश मूर्ती पालिकेच्या पथकाकडेच देणे बंधनकारक करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यामुळे दोन लसीचे डोस घेतलेल्या कार्यकर्त्यांना चौपाटीवर गणेश मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत समन्वय समिती आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत ही मागणी पूर्ण करून लसीचे दोन डोस घेतलेल्या दहा कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली. सोमवारच्या बैठकीत पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे आणि समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर उपस्थित होते.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र

टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!

खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी

पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!

सार्वजनिक मंडळांच्या गणेश दर्शनासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने या बैठकीत केली होती. मात्र याबाबतील निर्णय राज्य सरकार घेईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच रस्त्यांवरील खड्डे लवकरच बुजवण्यात येतील, असे आश्वासनही पालिकेने दिले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मूर्ती चार फूट तर घरगुती गणेश मूर्ती दोन फूट असावी. गर्दी होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी. विसर्जन ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती देणे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये आणि मोठ्या मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी, असे गणेशोत्सव नियमावलीत स्पष्ट केले आहे.

आधीच वेगवेगळ्या निर्बंधांमुळे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असताना अशा नवनव्या निर्बंधांची भर पडल्यामुळे गणेशभक्त कंटाळून गेले आहेत.

Exit mobile version