अन्न पदार्थ अधिक आरोग्यकारक

अन्न पदार्थ अधिक आरोग्यकारक

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय)ने अन्नपदार्थांतील ट्रान्सफॅटच्या मात्रेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे बाहेर मिळणारे अन्नपदार्थ अधिक आरोग्यपूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे.

एफ.एस.एस.ए.आयने अन्नपदार्थांतील ट्रान्सफॅट्सची मात्रा घटवून ३ टक्के केली आहे. आत्तापर्यंत ही मान्यता ५ टक्क्यांची होती. ही मान्यता २०२१ पासून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे, तर २०२२ पर्यंत २ टक्क्यांपर्यंत आणण्यात येणार आहे. यासाठी अन्न सुरक्षा मानांकनात बदल करण्यात आले आहेत.

हे बदलेले नियम खाद्यतेल, वनस्पती तुप, मार्गारिन, बेकरी आणि तळणासाठी वापरले जाणारे इतर पदार्थ यांसाठी लागू असतील.

ट्रान्सफॅटमुळे हृदयरोगाशी निगडित विविध आजारांचा धोका बळावतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात साधारणपणे दरवर्षी ५.४ लाख लोकांचा मृत्यू कृत्रिम रितीने तयार केलेल्या ट्रान्स फॅटच्या सेवनाशी निगडीत आजारांनी होतो. कोविड-१९ महामारीच्या काळात अशा प्रकारच्या बंधनांची आवश्यकता होती. त्यामुळे असंसर्गजन्य आजारांमुळे होणारे आजार टळतील, असे डॉक्टरांकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. ही बंधने इतर खाद्यपदार्थांना देखील लागू करण्यात यावीत अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्येच टी.एफ.ए २०२१ पर्यंत ३ टक्क्यांनी घटवण्याचे ध्येय ठरवले होते. तर भारताने २०११ मध्येच टी.एफ.ए मर्यादा १० टक्क्यांपर्यंत घटवण्याचे मान्य केले होते.

Exit mobile version