मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी त्यांच्या पहिल्यावहिल्या परदेशदौऱ्यासाठी चीनला पसंती दिली असली तरी याआधी मालदीवच्या प्रत्येक अध्यक्षाने भारताला पहिल्यांदा भेट दिली आहे. भारत आणि मालदीवचे संबंध आता ताणले असले तरी भारताने नेहमीच या राष्ट्राशी शेजारधर्म पाळला आहे. गेल्या काही वर्षांत मालदीवला कोणतेही संकट आले असले तरी त्यासाठी पहिल्यांदा भारतच धावून गेला आहे. मग सन २००४मध्ये मालदिवला आलेल्या त्सुनामीमध्ये सुमारे १०० जणांचा झालेला मृत्यू असो अथवा डिसेंबर २०१४मध्ये माले येथे उद्भवलेली पाणीचिंता… प्रत्येकवेळी भारताने मालदीवला मदतीचा हात दिला आहे. मालदीवला सन १९६५मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा द्विपक्षीय संबंध निर्माण करणारा भारत हा पहिला देश होता.
संरक्षण आणि सुरक्षा
संरक्षण क्षेत्रात सन १९८८पासून भारताचे मालदीवशी संबंध आहेत. सन २०१६मध्ये भारताचा मालदिवशी संरक्षणासंदर्भात करारही झाला होता. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मालदिव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या ७० टक्के संरक्षण प्रशिक्षणापैकी सुमारे ७० टक्के साधनांची पूर्तता भारताकडून केली जाते. गेल्या दशकभरात १५००हून अधिक मालदीवच्या सैनिकांना भारताने प्रशिक्षण दिले आहे. तसेच, हवाई टेहळणीसाठी हवाई साधनेही पुरवली आहेत.
विकास आणि पायाभूत सुविधा
हनिमाधू आणि गान आयलँडमधील विमानतळे, ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आणि गुल्हिफाल्हु बंदर आदी पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी भारताने मदत केली आहे. ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पांतर्गत माले शहर अन्य तीन परिसराशी ६.७४ किमी लांबीच्या पुलाने जोडले जाणार आहे. यासाठी भारताने ५० कोटी डॉलरची मदत जाहीर केली आहे.
हे ही वाचा:
मालदीवप्रकरणी चीनने खुपसले नाक
उरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेवरून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले
रामजन्मभूमीचे टाळे उघडून देणाऱ्या न्यायाधीशांना पाकमधून येत असत धमक्या
ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांच्या घरात ईडी
आरोग्य आणि शिक्षण
इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलसाठी भारताने ५२ कोटींचा निधी दिला आहे. तसेच, कर्करोगावरील उपचार मिळावे, यासाठी विविध बेटांवर १५० हून आरोग्य केंद्रे उभारली जाणार आहेत. भारताने सन १९९६मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन उभारण्यासाठी मालदीवला मदत केली होती. तसेच, मालदीवचे शिक्षक आणि तरुणांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही हाती घेतला होता. या अंतर्गत सन २०१९पासून सुमारे २२००हून अधिक मालदीवच्या नागरिकांनी विविध कार्यक्रमांतर्गत भाताला भेट दिली आहे. भारताकडून दरवर्षी इंडिया सायन्स अँड रिसर्च फेलोशिप प्रोग्रॅमअंतर्गत १० जागा मालदीवसाठी राखीव ठेवल्या जातात.
अर्थव्यवस्था आणि व्यापार
सन २०१४मध्ये पंतप्रधान मोदी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर भारत आणि मालदीवमधील व्यापारात चारपट वाढ झाली आहे. सन २०२२मध्ये दोन्ही देशांमध्ये ५०१.८२ दशलक्ष अमेरिकी डॉलरचा व्यवसाय झाला होता. हाच व्यापार सन २०१४मध्ये १७३.५० दशलक्ष डॉलर होता. सन २०२१मध्ये पहिल्यांदाच द्विपक्षीय व्यापाराने ३० कोटी अमेरिकी डॉलरची मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे मालदीव हा देश भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश ठरला होता. मालदीव हा भात, गव्हाचे पीठ, साखर, बटाटे, कांदे, अंडी, भाज्या आणि बांधकाम साहित्यासाठी भारतावर अवलंबून आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालदीवमधील सर्वांत मोठी बँक आहे. सन १९७४पासून असणारी ही बँक तिथे व्यवसायासाठी कर्जपुरवठा करते.
पर्यटन
अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन क्षेत्रावर सर्वाधिक अवलंबून असणाऱ्या मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारताचा वाटा सर्वाधिक आहे. मालदिवच्या एकूण महसुलापैकी एक तृतीयांश वाटा हा पर्यटन क्षेत्रातून येतो. सन २०२३मध्ये मालदीवला सर्वाधिक दोन लाख नऊ हजार १९८ भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. सन २०१८मध्ये भारतीय हेच सर्वाधिक पर्यटक होते. सन २०२०मध्ये करोनासाथ हळूहळू निवळत असताना सुमारे ६३ हजार भारतीयांनी मालदीवला भेट दिली.