निवडणूक रोख्यांचा नवा तपशील जाहीर झाला आहे. त्यात भाजपला सन २०१८पासून सुमारे सहा हजार ९८६ कोटी ५० लाखांची देणगी मिळाल्याचे उघड झाले आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील बंद लिफाफ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता. मात्र त्याची प्रत स्वतःकडे ठेवली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रती पुन्हा निवडणूक आयोगाला सुपूर्द केल्यानंतर आयोगाने हा तपशील त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केला.
नवीन तपशीलामध्ये निधी, रोख्यांची संख्या आणि एसबीआय शाखेचा समावेश आहे. तसेच, रोखे मिळाल्याचा दिनांक आणि पक्षाच्या बँकखात्यात निधी जमा झाल्याची तारीखही आहे. नवीन आकडेवारीनुसार, द्रमुकला फ्युचर गेमिंग कंपनीकडून ५०९ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. म्हणजे या कंपनीने दिलेल्या एकूण देणग्यांपैकी ३७ टक्के निधी एकट्या द्रमुकला दिला आहे. एसबीआय बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
हे ही वाचा:
हिमांशू, ओजस्वीने जिंकली सुवर्णपदके
‘मी पुन्हा येईन म्हटलं’…आलो अन येताना दोन पक्ष फोडून आलो!
यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!
१५ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावून एका दिवसात सर्व तपशील निवडणूक आयोगाला देण्याचे जाहीर केले. गुरुवारी जाहीर झालेल्या तपशीलामध्ये १२ एप्रिल, २०१९पासून एक हजार रुपये ते एक कोटी रुपयाचे निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या कंपन्यांची माहिती होती. मात्र प्रत्येक पक्षाला व्यक्तिशः किंवा एखाद्या कंपनीकडून किती देणगी मिळाली, हे जाहीर झाले नव्हते.