‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला’ अशी एक म्हण आपल्या मराठीत प्रसिद्ध आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता काबीज केल्यापासून मुख्यमंत्री ठाकरे हे राहुल गांधीगिरी करू लागले आहेत. मग कधी ती मुस्लिम लांगूलचालनाच्या रूपाने असते तर कधी स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय जवानांचा अपमान करून. संसद अथवा विधीमंडळाच्या व्यासपीठावरून रेटून असत्य कथन हा ही त्यातलाच प्रकार. कालचे त्यांचे विधानसभेतले भाषण बघून तर ‘बोल वो रहे है, लेकीन शब्द हमारे है’ असं म्हणणारे राहुल गांधी डोळ्यासमोर येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य संग्रामात योगदान नव्हते असे धादांत खोटं बोलत आपण राहुल गांधीचे पट्टशिष्य म्हणवायला किती पात्र आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केले. वास्तविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या जन्माचे मुळच स्वातंत्र्य संग्रामात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली डाॅ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. बालपणापासूनच डाॅ. हेडगेवारांच्यात क्रांतीची ज्योत तेवत होती. वाढत्या वयासोबत ती आणखीनच वाढत गेली. त्याकाळी बंगाल प्रांत हा भारतातील क्रांतिकारकांचे एक महत्वाचे केंद्र होता. याच कारणामुळे डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी कलकत्त्याला जायचा निर्णय घेतला. योगीन्द्र श्री अरविंद घोष यांनी स्थापन केलेली ‘अनुशीलन समिती’ ही त्याकाळची क्रांतिकारकांची एक प्रसिद्ध संघटना. केशवपंत हेडगेवार हे केवळ या समितीचे सदस्य नव्हते तर या संस्थेच्या अंतरंग मंडळातही होते. त्या काळात क्रांतिकारी आपले खरे नाव वापरत नसत. आपली खरी ओळख लपवून टोपण नाव धारण केलेले असे. त्यामुळे क्रांतिकारकांमध्ये डॉ. हेडगेवार ‘कोकेन’ या आपल्या टोपण नावानेही प्रसिद्ध होते. नागपूरला परतल्यानंतरही डॉ. हेडगेवार आपल्या बंगालमधील सहकाऱ्यांना मदत करत असत. बंगालमधील क्रांतिकारकांची पिस्तुले त्यांच्याकडे नागपूरला पाठवली जात असत आणि ती नागपूरमध्ये दुरुस्त करून पुन्हा बंगालला पाठवली जात. या अत्यंत जोखमीच्या कार्यात डॉ. हेडगेवार हे महत्वाचा दुवा होते.
डॉ. हेडगेवार हे काँग्रेसशी संलग्नही होते. केवळ सदस्य नाही तर सक्रिय कार्यकर्ते होते. १९२० साली महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पुकारलेल्या असहकार आंदोलनात हेडगेवार सक्रिय होते. त्यासाठी त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षाही झाली होती. १९ ऑगस्ट १९२१ ला डॉक्टरांना शिक्षा ठोठावली गेली आणि १२ जुलै १९२२ ला त्यांची मुक्तता झाली. पुढे संघस्थापने नंतरही त्यांनी आपले क्रांतिकार्य चालूच ठेवले होते. १९३० च्या प्रसिद्ध अशा जंगल सत्याग्रहातही डॉ. हेडगेवार आपल्या इतर काही सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. या सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे डॉक्टरांना दुसऱ्यांदा कारावासाची शिक्षा झाली होती.
डॉ. हेडगेवारांच्या प्रत्येक कृतीत राष्ट्रकार्याचीच प्रेरणा होती. १९२३ मध्ये डॉ. हेडगेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपुरात एक दैनिक काढायचे ठरवले. भारतीय स्वातंत्र्याची बाजू मांडणाऱ्या त्या दैनिकाचे नावही होते ‘स्वातंत्र्य’. यावरून लक्षात येऊ शकते की डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रत्येक कार्यामागे स्वातंत्र्याचीच प्रेरणा होती आणि ती पण संपूर्ण स्वातंत्र्याची.
काँग्रेसने १९३० साली ‘स्वातंत्र्य’ हेच ध्येय असल्याचे स्विकारले. २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचे काँग्रेसने ठरवले तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी पत्र लिहून संघाच्या सर्व शाखांना सूचना केली की या दिवशी संघस्थानावर राष्ट्रीय ध्वजाचे म्हणजेच भगव्या ध्वजाचे वंदन करावे.
या पत्रात डॉ. हेडगेवार असे म्हणतात, “व्याख्यान रूपाने सर्वांना स्वातंत्र्य म्हणजे काय व तेच ध्येय आपले समोर ठेवणे हे प्रत्येक हिंदवासीयाचे कसे कर्तव्य आहे हे विशद करून सांगावे.” वास्तविक डॉक्टरांचे हे वाक्य वाचल्यावर संघ स्थापने मागचा हेतू आणि संघाचे उद्दिष्ट याबद्दल यत्किंचितही शंका कोणाच्याही मनात राहता कामा नये. पण वाडवडिलांच्या कार्यावर शेखी मिरवणाऱ्या कर्तृत्वशून्य राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा करणे म्हणजे पाकिस्तानकडून शांतीप्रिय असण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे.
बरं हे झालं इंग्रजांविरोधातील स्वातंत्र्य लढ्याचे. पण राहुल गांधींच्या आजीने जेव्हा भारतात आणीबाणी लादत नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेतले होते, तेव्हादेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या विरोधात उभा ठाकला होता. पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संघटनेने मात्र त्यावेळी आणीबाणीचे समर्थन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंनी संघाच्या इतिहासाबद्दलचे आपले अज्ञान प्रकट करताना किमान आपण लावलेले दिवे विसरू नयेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कायमच राष्ट्रकार्यासाठी कटिबद्ध राहिलेली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून ते राष्ट्रीय आपत्तींपर्यंत संघ कायमच या देशासाठी खंबीरपणे पाय रोवून उभा होता, आहे आणि राहील. राष्ट्र्राला परंवैभवापर्यंत नेण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या स्वयंसेवकांचे योगदान खुर्चीसाठी हिंदुत्वाशी प्रतारणा करणाऱ्यांना कळूच शकत नाही.