हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून सामान्य मुंबईकरांना २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याची घाेषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबईत सुमारे २२७ आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा शुभारंभ हाेणार आहे. आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जातील असही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे या यासंदर्भात घेतलेल्या आढाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे क्लिनिक आणि पॉलिक्लिनिक चालविण्यात येणार आहे. सध्या ५० ठिकाणी या क्लिनिकचे काम पूर्ण झाले असून शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत २२७ क्लिनिक उभारण्यात येतील. त्यामध्ये ३४ पॉलिक्लिनिक असतील.
साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येकरीता एक याप्रमाणे हे क्लिनिक सुरू करण्यात येईल. सकाळी सात ते दोन, दुपारी तीन ते रात्री दहा अशी रुग्णाच्या सोयीनुसार दोन सत्रात या दवाखान्याची वेळ असणार आहे. या दवाखान्यात एक एमबी बी एस डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता, आणि बहुउद्देशीय कामगार असे मनुष्यबळ असेल.पॉलीक्लिनिक महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी असेल. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. झोपडपट्टीभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटची संख्या वाढवावी तसेच मॅमोग्राफीसाठी देखील मोबाईल व्हॅन सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई
अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार
इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीरnews
२०२२-२३ च्या अर्थसंकल्पात पालिकेने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. घराजवळील दवाखान्याचा सर्वाधिक फायदा गोरगरिबांना होऊ शकतो. झोपडीवासीयांना घराजवळ दवाखाना उपलब्ध झाल्यास त्यांचा पैसा व वेळेची बचत होर्इल या उद्देशाने हे आराेग्य केंद्र सुरू करण्याचा विचार यामागे आहे. पालिकेची नियमित आरोग्य केंद्रे दुपारी चार वाजता बंद झाल्यानंतरही नवीन दवाखाने रात्री दहापर्यंत सुरू राहतील. त्यामुळे संध्याकाळी कामावरून आलेल्या व्यक्तीलाही उपचार मिळू शकतील.