देश कोरोना महामारीशी झुंज देत असताना भारत सरकार नागरिकांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसत आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने धान्य वाटपाच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी योजनांच्या अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरित करणारी दुकाने आता आठवड्याचे सातही दिवस आणि ती पण अधिकच्या वेळेसाठी उघडी असतील.
देशात सुरु असलेला कोवीडचा हाहाकार बघता अनेक राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात कडक निर्बंध अथवा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या टाळेबंदीचा परिणाम स्वस्त धान्य दुकानांच्या वेळेवरही होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ही दुकाने महिन्यातील सर्व दिवशी सुरु ठेवावीत असे निर्देश दिले आहेत. या दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री-गरीब कल्याण अन्न योजनांच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याचे वितरण लाभार्थ्यांना संपूर्ण दिवसभर व्हावे यासाठी वेळेच्या पालनात सूट देणारी नियमावली रविवार, १६ मे रोजी जारी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात
जपा स्वतःला…परिणाम होईल डोक्यावर
स्वस्त धान्य दुकानांमधून गरजूंपर्यंत वेळेवर धान्य पोचण्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. या योजनेची आणि उपाययोजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचे निर्देशही केंद्र सरकारतर्फे देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे.