आज जर्मनीचा खेळाडू मॅट हमेल्स याने केलेल्या स्वयंगोलच्या जोरावर फ्रान्सने आपल्या युरो कॅम्पेनमध्ये विजयी सलामी दिली आहे. तर या पराभवामुळे आता जर्मनीचा युरो स्पर्धेतील पुढचा प्रवास कठीण झाला आहे.
मंगळवार, १५ जून हा दिवस फुटबॉल रसिकांसाठी चांगलीच मेजवानी घेऊन आला होता. युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील ग्रुप एफ अर्थात ‘ग्रुप ऑफ डेथ’ मधील चार संघ मंगळवारी आपसांत भिडले. फ्रान्स,जर्मनी आणि पोर्तुगाल असे तीन दादा संघ या ग्रुप मध्ये एकत्र असल्यामुळे या ग्रुपमध्ये चांगलीच सुरस आहे.
यापैकी पहिल्या सामन्यात पोर्तुगाल संघ हंगेरी विरोधात खेळताना अपेक्षेप्रमाणे सहज विजय संपादन करून गेला. पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोल्सच्या जीवावर पोर्तुगालने हंगेरीला ३-० फरकाने हरवले.
तर जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेला फ्रान्स विरुद्ध जर्मनी हा सामना अपेक्षेप्रमाणे अटीतटीचा झाला. पण तरीही या सामन्यात फ्रान्सचे पारडे हे जर्मनीपेक्षा जड दिसून आले. फ्रान्सने या सामन्यात १-० असा विजय संपादन केला असून त्याला जर्मनीचा बचाव फळीतील खेळाडू मॅट हमेल्स हा कारणीभूत ठरला आहे.
सामन्याच्या २० व्या मिनिटाला फ्रान्सचा आघाडीचा खेळाडू पॉल पोगबा याने लूकास हर्नांडेझ या खेळाडूकडे बॉल पास केला. हर्नांडेझ याने तो बोल जर्मनी संघाच्या ‘डी’ संघ क्षेत्रात क्रॉस केला. त्या क्रॉस पर्यंत कोणताही फ्रेंच खेळाडू पोहोचू शकला नसला तरीही त्या वेगवान क्रॉस वर जर्मनीचा डिफेंडर मॅट हमेल्स याचाच पाय लागून गोल झाला.
संपूर्ण मॅचमध्ये नोंदवण्यात आलेला हा एकमेव अधिकृत गोल ठरला. त्यानंतरही फ्रान्सकडून दोन वेळा गोल करण्यात आला. पण या दोन्ही वेळेला फ्रान्स खेळाडू ऑफ साईड असल्यामुळे हे गोल रद्द करण्यात आले.
हे ही वाचा :
कोल्हापूरात छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरु
काँग्रेसमध्ये भाई जगताप विरुद्ध झिशान सिद्दिकी
ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळतंय
कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये दोन हजाराने वाढ
आणखी एक विशेष बाब म्हणजे २०१४ साली फिफा विश्वचषकाच्या उप उपांत्य फेरीत जर्मनी आणि फ्रान्स हे दोन संघ एकमेकांशी भिडले होते. तेव्हा याच मॅट हमेल्सने केलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने फ्रान्सला स्पर्धेतून बाहेर फेकले होते.