काश्मीरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये हल्लासत्र सुरूच आहे. गुरवारी, १४ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील बडगाम भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले आहे. चकमक स्थळाकडे जाताना सुरक्षा दलांच्या वाहनाला अपघात झाल्याने दोन लष्करी जवानांना प्राण गमवावे लागले. त्यांनतर रात्री उशिरापर्यंत या भागात शोधमोहीम व चकमक सुरु होती.
शोपियानच्या झेनपोरा भागाजवळील बडगाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुरुवारी सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला होता. मात्र यांनी याकडे दुर्लक्ष केले आणी संघर्षाची ठिणगी उडाली. परिसरात इतर दहशतवादी असल्याच्या कारणावरून सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरूच आहे. ठार झालेले चार दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.
हे ही वाचा:
देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर
फडणवीसांनी १४ ट्विटस करत केली शरद पवारांची पोलखोल
त्यावेळी चकमकीच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. चकमक स्थळी पोहोचण्यापूर्वीच मार्गात वाहन पलटी झाल्याने चार जवान जखमी झाले. सर्व जखमींना शोपियांच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला. अन्य दोन जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या परिसरात इतर दहशतवादी असल्याच्या भीतीने सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरूच ठेवली आहे. अन्य एका घटनेत कुलगाममघो हल्लेखोरांनी एका वाहनावर केलेल्या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे.