दाऊदच्या आईच्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव!

लिलावप्रक्रिया तीन माध्यमांतून होणार

दाऊदच्या आईच्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव!

फरार दहशतवादी दाऊद इब्राहिम याची आई अमिनाबाई हिच्या नावावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चार मालमत्तांचा लिलाव मुंबईत शुक्रवारी होणार आहे. या चारही मालमत्ता शेतजमनी असून खेडमधील मुंबाके गावात आहेत. येथेच दाऊद आणि त्याची भावंडे बालपणी काही काळ राहिली होती. हा लिलाव संबंधित प्राधिकरण आणि स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स कायदा साफेमा या अंतर्गत होणार आहे. हा विभाग केंद्रीय अर्थमंत्रालयाअंतर्गत येतो.
गेल्या नऊ वर्षांत दाऊद किंवा त्याच्या नातेवाइकाच्या ११ मालमत्ता साफेमा प्राधिकरणातर्फे लिलावात काढण्यात आल्या आहेत.

आता ज्या चार मालमत्तांचा लिलाव होणार आहे, त्याची एकूण राखीव किंमत १९.२ लाख रुपये आहे.पहिली मालमत्ता १० हजार ४२०.५ चौरस मीटर असून त्याची राखीव किंमत ९.४ लाख रुपये आहे. दुसरी मालमत्ता आठ हजार ९५३ चौरस मीटरची असून त्याची राखीव किंमत आठ लाख रुपये आहे. तिसरी मालमत्ता १७१ चौरस मीटरची असून त्याची राखीव किंमत १५ हजार ४४० रुपये आहे. तर, चौथी मालमत्ता एक हजार ७३० चौरस मीटर असून त्याची राखीव किंमत दीड लाख रुपये आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक!

अरुण योगीराज यांनी साकारलेल्या राममूर्तीची होणार प्रतिष्ठापना!

अर्जुन पुरस्कार विजेत्या पोलीस उपाधीक्षकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

कृष्णविवरांचा तपास करणारा भारत अमेरिकेनंतर दुसरा देश

ही लिलावप्रक्रिया तीन माध्यमांतून होईल. पहिल्यांदा ई-लिलाव, नंतर जाहीर लिलाव आणि बंद पाकिटात निविदा… अशा पद्धतीने होईल. या चारही मालमत्तांवर सरकारने आधीच टाच आणली आहे. यशस्वी सेफेमा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यशस्वी बोली लावणाऱ्यावरच मालमत्ता नावावर हस्तांतरित करण्याची जबाबदारी असेल. लिलावाच्या प्रत्येक पद्धतीसाठी बोलीदारांनी अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे आणि या लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत बुधवारपर्यंत आहे.

अवघ्या पंधरवड्यापूर्वी, पाकिस्तानमध्ये दाऊदला अज्ञात व्यक्तींनी कथितरित्या विषप्रयोग केल्याचे वृत्त आले होते, परंतु त्याचा जवळचा सहकारी छोटा शकीलने हे वृत्त फेटाळून लावले होते. सन २०१७मध्ये सफेमा कायद्यांतर्गत दाऊदच्या हॉटेल रौंक अफरोज, शबनम गेस्ट हाऊस आणि भेंडी बाजारजवळील डमरवाला इमारतीतील सहा खोल्यांचा लिलाव करण्यात आला होता. त्यातून ११ कोटी रुपये मिळाले होते. दाऊदचा धाकटा भाऊ, इक्बाल कासकर, नागपाडा येथील गॉर्डन हॉल अपार्टमेंटमधील त्याची दिवंगत बहीण हसिना पारकरच्या फ्लॅटमध्ये जाण्यापूर्वी सन २०१७च्या मध्यापर्यंत डमरवाला इमारतीत राहिला. कासकरला २०१७मध्ये अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

Exit mobile version