आरेतील मेट्रो कारशेडसाठी आता पुढची तयारी सुरू झालेली आहे. मेट्रोचे डबे नेण्यासाठी तेथील काही झाडांच्या फांद्या तोडण्यात येत असताना झाडे तोडण्यात येत असल्याचा कांगावा करण्यात आला. तशा पद्धतीचे फोटो व्हायरल करून पुन्हा एकदा झाडे तोडण्यात येत आहेत, अशा बातम्या पसरविण्यात आल्या. आरेमध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) नेमलेल्या कामगारांनी सोमवार, २५ जुलै रोजी सकाळी कठोर पोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील झाडांच्या काही फांद्या तोडण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी जमण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घटनेनंतर सेव्ह आरे या मोहिमेच्या आंदोलकांनी चार कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी वनराई पोलिस ठाण्यात संध्याकाळी धरणे धरले. त्यानंतर रात्री चौघांचीही सुटका करण्यात आली. मेट्रो ३ ट्रेनचे डबे घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी झाडाच्या फांद्या तोडत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, फांद्या कापल्या जात असतानाही झाडे कापली जात असल्याचा प्रचार केला जात आहे.
मेट्रो कामामुळे आरे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सूचना दिल्या असतानाही पोलिसांच्या आदेशाचे पालन न करता काही कार्यकर्ते तिथे जमले. त्यामुळे तबरेज सय्यद, जयेश भिसे, रोहित जाधव आणि लक्ष्मण जाधव यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिस कायद्याच्या कलम ६८/६९ नुसार चार जणांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले,” अशी माहिती डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली.
हे ही वाचा:
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”
सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला
विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत
मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान
सय्यद आणि भिसे यांना आदल्या दिवशीही आंदोलन करत असताना नोटीस बजावण्यात आली होती. गेल्या महिनाभरात एकूण २० कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात, शिंदे- फडणवीस सरकारने आरेमध्ये मेट्रो ३ कारशेडच्या बांधकामावर माजी सरकारने घातलेली स्थगिती उठवली.