संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे बुधवार, १६ ऑगस्ट रोजी अमेरिकेत निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅलिफोर्नियातील नातेवाईकांच्या घरी त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. अरुणाचलम यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
अरुणाचलम यांच्यावर तीव्र निमोनिया आणि पार्किन्सन आजारावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, तीन मुले रघु, मालविका, रामू आणि सहा नातवंडे असा परिवार आहे.
अरुणाचलम यांनी भाभा अणू संशोधन केंद्र, नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी आणि डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. २०१५ मध्ये, अरुणाचलम यांना वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी डीआरडीओचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अरुणाचलम हे डीआरडीओचे प्रमुख होते.
१९८२-९२ या कालावधीत ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागारही होते. अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (१९८०), पद्मभूषण (१९८५) आणि पद्मविभूषण (१९९०) प्रदान करण्यात आले होते. रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे (युके) पहिले भारतीय फेलो होते. कार्नेगी मेलॉन विद्यापीठ, पिट्सबर्ग येथे एक विशिष्ट सेवा प्राध्यापक (अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरण) देखील होते.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न कोणाचा?
रशियाचे ‘लुना-२५’ भारताच्या ‘चांद्रयान- ३’ च्या दोन दिवस आधी पोहचणार
मविआचा पोपट मेलाय ! पण घोषणा कोण करणार ?
ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील चर्च आणि इमारतींची तोडफोड !
डॉ. अरुणाचलम यांच्या निधनाने वैज्ञानिक समुदाय आणि धोरणात्मक जगामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे ज्ञान, संशोधनाची आवड आणि भारताच्या सुरक्षा क्षमतांना बळकट करण्यासाठी भरीव योगदानाबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांप्रती संवेदना. ओम शांती, अशा भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.