मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आला आहे.या प्रकारामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.सचिवालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे यांची बनावट स्वाक्षर आणि शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले.यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची सही असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयात येतात.या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होते.त्यानंतर ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जातात.त्यानंतर ती कागदपत्रे संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात.
हे ही वाचा:
‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला
आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी
अकबर महान कसला?, तो तर बलात्कारी!
सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर
दरम्यान, नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली.मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.या प्रकरणी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.