काश्मीर खोऱ्यात अवतरला परदेशी पर्यटकांचा ‘स्वर्ग’

पाच महिन्यांत येथे आलेल्या पर्यटकांच्या संख्येने गेल्या संपूर्ण वर्षभरातील विदेशी पर्यटकांची संख्या ओलांडली

काश्मीर खोऱ्यात अवतरला परदेशी पर्यटकांचा ‘स्वर्ग’

‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे ज्याला म्हटले जाते, त्या काश्मीर खोऱ्याला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. या वर्षी पहिल्या पाच महिन्यांमध्येच सुमारे १८ हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली असून ही संख्या गेल्या तीन दशकांमधील सर्वांत अधिक आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जी २० शिखर संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर विदेशी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या दक्षिण आशियाई देशांमधील पर्यटकांसह इटली, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या पाश्चिमात्य देशांमधील पर्यटकही आवर्जून काश्मीरच्या खोऱ्यात आले आहेत.

 

‘जी २० चा कार्यक्रम यशस्वी झाला. जगभराने जम्मू-काश्मीरची पर्यटनक्षमता पाहिली. जी २० देशांचे राजदूत, प्रतिनिधी आणि उच्चायुक्तांनी जम्मू काश्मीरचे आदरातिथ्य अनुभवले. आता खोऱ्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या तीनपट वाढली आहे. या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत येथे आलेल्या पर्यटकांच्या संख्येने गेल्या संपूर्ण वर्षभरातील विदेशी पर्यटकांची संख्या ओलांडली आहे. काही दशकांपूर्वी जम्मू काश्मीर हे साहसी आणि आध्यात्मिक पर्यटनाच्या बाबत जगभरातील प्रमुख ठिकाणांपैकी एक होते. आता पुन्हा हे राज्य जगभरातील अग्रगण्य पर्यटन स्थळांमध्ये गणले जाईल,’ असा विश्वास पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे सचिव सैयद आबिद रशिद शाह यांनी व्यक्त केला.

 

गेल्या वर्षी १० हजार विदेशी पर्यटक

‘गेल्या वर्षी संपूर्ण वर्षभरात १० हजार विदेशी पर्यटकांनी काश्मीर खोऱ्याला भेट दिली होती. यंदा मात्र पाच महिन्यांतच १८ हजार विदेशी पर्यटक येथे आले आहेत,’ असे हाऊसबोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मंजूर अहमद पख्तून यांनी सांगितले.

 

विदेशी पर्यटक खूष

नेदरलँडमधील एली पतीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यात मुक्कामाला आहे. त्यांना येथे घरातच राहिल्यासारखे वाटत आहे. त्या आता लवकरच येथून जाणार असल्याने त्या थोड्या निराश झाल्या आहेत. हॉलंडमध्ये आम्हाला काश्मीर खोऱ्यात न जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मला येथे पूर्णपणे सुरक्षित वाटते आहे. काश्मीरची माणसे मदत करणारी आहेत. लोकांनी आवर्जून काश्मीर खोऱ्यात आले पाहिजे, असे ती म्हणते. तर, काश्मीरला इतिहास आहे, येथे स्वादिष्ट भोजन मिळते आणि खूप विनम्र लोक येथे राहतात, असे इटलीचा प्रवासी ऍलेग्झांडर याने सांगितले.

Exit mobile version