प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच वायूदलाच्या रणरागिणी

४८ अग्निवीर महिला होणार सहभागी

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच वायूदलाच्या रणरागिणी

भारताचा प्रजासत्ताक दिन अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारीही जोरदार सुरू आहे. या दिवशी होणारे संचलन, चित्ररथ परेड याकडे लक्ष असणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महिलांचा विशेष सहभाग असणार आहे. अग्निवीर महिला या संचलनात सहभागी होणार असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

प्रजासत्ताक दिनी भारताच्या तीनही दलाचे संचालन असते. यावेळी भारतीय वायूदलाच्या परेडमध्ये एकूण ४८ अग्निवीर महिला सहभागी होणार आहेत. भारतीय वायू सेनेच्या मार्चिंग तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर रश्मी ठाकूर करणार आहेत. तर, स्क्वॉड्रन लीडर सुमिता यादव, स्क्वॉड्रन लीडर प्रतिती अहलुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनंट कीर्ती रोहिल या महिला अधिकारीदेखील यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी असल्याचे प्रतीत होत आहे.

याव्यतिरिक्त, भारतीय वायूसेनेच्या १५ महिला पायलट फ्लायपास्ट दरम्यान भारतीय वायू दलाच्या विविध विमानांचे संचालन करणार आहेत. यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाची वायू दलाची थीम ‘भारतीय वायू सेना: सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर’ अशी आहे.

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताचं लष्करी सामर्थ्य पाहायला मिळणार आहे. यामध्ये लढाऊ विमाने, आठ वाहतूक विमाने, १३ हेलिकॉप्टर आणि एक हेरिटेज विमान कर्तव्यपथावरून आकाशात झेपावणार आहे. फ्लायपास्टचे यंदा वायूदलाच्या ताफ्यात नुकतेच समाविष्ट केलेले C-295 वाहतूक विमान प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.

हे ही वाचा:

घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालणार

नटली, सजली अयोध्या नगरी…

सानिया मिर्झाशी वेगळा झाल्यावर शोएब मलिकचे तिसरे लग्न

कोणी जावो अथवा न जावो, राम मंदिर सोहळ्याला मी जाणार!

याशिवाय स्वदेशी विकसित लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) ‘तेजस’देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये असणार आहे. परेडमधील ‘तेजस फॉर्मेशन’मध्ये चार जेट विमाने उड्डाण करतील. याशिवाय, यंदाच्या परेडमध्ये सहा राफेल लढाऊ विमानेही ‘वजरांग फॉर्मेशन’मध्ये उड्डाण करणार आहेत.

Exit mobile version