दिल्लीमध्ये विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका हा सामना सुरू असताना एका फलंदाजाला वेगळ्याच नियमामुळे बाद दिल्याने हा निर्णय चर्चेचा ठरला आहे. श्रीलंकेचा फलंदाज अँजलो मॅथ्यूज हा एकही चेंडू न खेळता बाद झाला. टाईम आऊटमुळे अँजलो मॅथ्यूज याला बाद देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट झाल्यानंतर बाद देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ असून याआधी असे बाद कुणालाही दिले नव्हते. त्यामुळे या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज खेळण्यासाठी मैदानात आला. त्याने स्ट्राईकही घेतली, पण हेल्मेटचा भाग तुटल्याचे लक्षात आल्यामुळे मॅथ्यूजने ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवले. यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने पंचाकडे बाद देण्याची दाद मागीतली. त्यानंतर मैदानावर थोडावेळ राडा झाला. पण, क्रिकेटच्या नियमांनुसार, कोणत्याही फलंदाजाला दोन मिनिटांच्या (१२० सेकंद) आत स्ट्राईक घ्यावी लागते. पण, हेल्मेट नसल्यामुळे मॅथ्यूजला स्ट्राईक घेता आली नाही आणि शाकीबने पंचांकडे दाद मागितली. नियमांनुसार, पंचांनी त्याला बाद दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट झाल्यानंतर बाद देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
अँजलो मॅथ्यूजला बाद दिल्यानंतर सोशल मीडियवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उठत आहेत. काहींनी नियमानुसार निर्णय असल्याने या निर्णयाला समर्थन दिले आहे तर, काहींनी टीका केली आहे. मॅथ्यूजने जाणूनबुजून उशीर केला नसून त्यातही खिलाडूवृत्ती दाखवून शाकीबने अपील माघारी घ्यायला हवी होती, असे काहींनी म्हटले आहे. सोशल मीडियावर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या समर्थकांमध्ये देखील शाब्दिक भांडणे सुरू झाली आहेत.
हे ही वाचा:
भारतातील ८८ भाताच्या वाणांचे संवर्धन होणार
जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
नियम काय?
आधीचा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढील फलंजाजाला दोन मिनिटांत (१२० सेकंद) स्ट्राईक घ्यावी लागते. जर, वेळेवर स्ट्राईक घेतली नाही तर प्रतिस्पर्धी खेळाडू बादची पंचाकडे दाद मागू शकतात. शाकीबनेही पंचाकडे दाद मागितली. त्यानंतर एकही चेंडू न खेळता, धाव न काढता मैदानावर येऊन मॅथ्यूजला बाद दिले गेले.