नागपुरात ‘हिट अँड रन’अपघातात एका ८२ वर्षीय व्यक्तीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ३०० कोटींच्या कौटुंबिक मालमत्तेसाठी या वृद्धाच्या सुनेनेच हा भीषण हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे.
पुरुषोत्तम पट्टेवार यांना गाडीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या १५ दिवसांनंतर त्यांची सून नगररचना विभागातील सहाय्यक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार हिला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.
ही हत्या घडवून आणण्यासाठी अर्चना हिने मारेकऱ्यांना एक कोटी रुपये दिले होते. तसेच, धडक देण्यासाठी गाडी खरेदी करण्याकरिता पैसेही दिले. ही हत्या अपघातासारखी वाटावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. सासऱ्यांच्या ३०० कोटींच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे तपास उघड झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
५३ वर्षीय अर्चना हिने पतीचा चालक बागडे आणि दोन आरोपी नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांच्यासोबत हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी त्यांच्यावर आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत हत्या आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्यांच्याकडून दोन गाड्या, सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
हत्या करण्यासाठी फॅन क्लबच्या सदस्याचा वापर!
संत, धर्माचार्यांकडून ओम प्रमाणपत्राला भक्कम समर्थन, मोहीमेला दिले शुभ आशीर्वाद
डोडामध्ये लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध
भारत विरुद्ध चित्तथरारक सामन्यात अमेरिककडून चूक; पाच धावांची पेनल्टी
घटनेच्या दिवशी पुरुषोत्तम पुत्तेवार हे शस्त्रक्रियेनंतर बरे होत असलेल्या पत्नी शकुंतला यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. परत येताना भाड्याच्या गाडीने त्यांना धडक दिली. त्यांचा मुलगा आणि अर्चनाचा नवरा मनीष डॉक्टर आहे.
हत्या प्रकरणाच्या तपासात अर्चना पुत्तेवार हिच्या नगररचना विभागातील कामातही घोर अनियमितता आढळून आली आहे. अनेक तक्रारी आल्या, पण तिच्या राजकीय संबंधांमुळे कोणतीही कारवाई झाली नाही, असे तपासात निष्पन्न झाले आहे. तिच्यावर नियमांचे उल्लंघनाचा आरोप आहे. तिची अटक आणि कौटुंबिक सदस्याच्या हत्येचा कट रचल्याच्या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर तिच्या कामातील कथित अनियमिततेचा तपास होण्याचीही शक्यता आहे.