तो दिवस फुटबॉलपटू चिंगलेनसाना सिंग कधीही विसरणार नाही. कोझिकोडचा तो नेहमीसारखा दिवस होता. मे महिन्यातील एक नेहमीसारखी संध्याकाळ. चिंगलेनसाना ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्याने फोन पाहिल्यावर त्याला खूप मिस्ड कॉल येऊन गेले होते. फोनवर भरपूर मेसेजही येऊन पडले होते. त्याने काळजीने पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. पण लवकरच त्याला खरी परिस्थिती कळून चुकली. ३ मे रोजी मणिपूरमध्ये उद्भवलेल्या हिंसाचारात त्याने त्याचे सर्व काही गमावले होते.
चुराचंदपूर जिल्ह्यातील खुमुजामा लीकाई हे २७ वर्षीय चिंगलेनसानाचे गाव. ३ मे रोजी कोझिकोडमध्ये तो एएफसी कप प्लेऑफ (आशियाई खंडातील स्पर्धा)मध्ये हैदराबाद एफसीचे प्रतिनिधित्व करत होता. त्याचा सामना मोहन बागान विरुद्ध होणार होता आणि याच दिवशी त्याने सारे काही गमावले. ‘या हिंसाचाराने आम्ही कमावलेले, आमच्याकडे असलेले सर्व काही हिरावून घेतले आहे,’ असे खिन्न स्वरात तो सांगतो.
“आमच्या घराला आग लागल्याची बातमी मी ऐकली. मी चुरचंदपूरमध्ये बांधलेला फुटबॉल मैदानही जाळल्याचे मला समजले. ते खरोखरच हृदयद्रावक होते. तरुणांना फुटबॉल खेळासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे माझे मोठे स्वप्न होते, पण ते हिरावून घेतले गेले. सुदैवाने, माझे कुटुंब हिंसाचारातून बचावले आणि त्यांना मदत केंद्रात हलवण्यात आले,’ असे त्याने सांगितले.
हे ही वाचा:
पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ
अतिक अहमदला आव्हान देणाऱ्या ‘सपा’च्या आमदार पूजा पाल भाजपमध्ये जाणार ?
पुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त
संभाजी भिडेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या यशोमती ठाकूर यांना धमकी !
थोडा वेळ प्रयत्न केल्यावर, त्याचा त्याच्या आईशी संपर्क होऊ शकला. तेव्हा दुसऱ्या बाजूला गोळ्यांचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याने लगेचच त्याच्या पालकांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला अजून उशीर करायचा नव्हता. कारण तोपर्यंत झालेल्या हिंसाचाराने त्याचे घर उद्ध्वस्त केले होते, त्याचे गाव उद्ध्वस्त केले होते आणि महत्त्वाकांक्षी फुटबॉलपटूंच्या स्वप्नांना पंख देण्याच्या त्याच्या आशा धुळीस मिळाल्या होत्या. केवळ वाचले ते त्याचे कुटुंब.
तो दु:खाने, या संकटाने हादरला असला तरी त्याचा धीर अजिबात खचलेला नाही. त्याने अजूनही पुढे काही तरी करण्याची उमेद बाळगली आहे.
“चुराचंदपूरमधील हुशार तरुणांना फुटबॉलसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे माझे नेहमीच मोठे स्वप्न होते. त्यांना फुटबॉल प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना व्यावसायिक खेळाडू बनण्यास मदत करावी म्हणजे ते भविष्यात राष्ट्रीय संघासाठी खेळतील, हा माझा उद्देश होता. पण आम्ही पुन्हा शुन्यापासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करू,” अशा शब्दांत त्याने अजून हार मानलेली नाही, असेच सांगितले आहे.