गुरुवारी क्रीडाक्षेत्रात एक दुःखद घटना घडली. १९५६ च्या मेलबर्न आणि १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताच्या फुटबॉल संघाचे प्रतिनिधत्व करणारे गोलरक्षक शंकर सुब्रमण्यम नारायण तथा एस.एस. बाबू नारायण यांचे गुरुवारी ठाणे येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. नारायण हे ८६ वर्षांचे होते. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अधिकृत संकेतस्थळावरून नारायण यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय संघाचे माजी गोलरक्षक श्री. एस एस (बाबू) नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. अशी माहिती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या संकेतस्थळावरून देण्यात आली. नारायण यांनी भारतीय फुटबॉलला दिलेले योगदान हे कधीही न विसरण्यासारखे आहे. मी दुःखात सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिली.
एस एस नारायण यांनी मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये युगोस्लाव्हिया विरुध्द ४ डिसेंबर १९५६ मध्ये पहिला सामना खेळला होता. नऊ सामन्यांमध्ये नारायण यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मेलबर्न आणि रोम अशा दोन ऑलिम्पिक स्पर्धांचे ते भाग होते. १९५८ मधील आशियाई आणि १९६४ च्या एएफसी एशियन कप स्पर्धांचेही भाग होते.
एस एस नारायण हे फुटबॉल आणि बास्केटबॉल दोन्ही खेळ खेळत होते. २०१३ मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनने त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी सत्कार केला होता. बास्केटबॉल खेळात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. मुंबईतील काही क्लबसाठीही ते खेळले होते. गुरुवारी रुग्णालयातून घरी येत असताना त्यांच्या घरासमोर ते अचानक जमिनीवर कोसळले आणि नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.