‘फ्लाईंग सिख’ ने घेतला जगाचा निरोप

‘फ्लाईंग सिख’ ने घेतला जगाचा निरोप

‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले जगप्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. शुक्रवार १८ जून रोजी मिल्खा सिंह यांनी चंदिगड येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोविड १९ महामारी ही त्यांच्या निधनाला कारणीभूत ठरली आहे.

मे महिन्याच्या १९ तारखेला ९१ वर्षीय मिल्खा सिंह यांना महामारीने ग्रासले. पण कोविडची कोणतीच लक्षणे दिसत नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीचा काही काळ चंदीगड येथील आपल्या निवासस्थानी गृह विलगीकरणात काढला. पण २४ मे रोजी त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्यूमोनिया झाला होता. मोहालीतील रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

३ जून रोजी मिल्खा यांना उपचारांसाठी चंदीगड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या उपचारांचा त्यांना फायदा झाला असून १३ जून रोजी त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती. पण त्यांना कोविड पश्चात होणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी जाणवत होत्या. त्या उपचारासाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हे ही वाचा:

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

महापालिकेचे खासगीकरण होतेय का?

कसोटी विश्वचषक अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून

मविआ सरकारला आता हवीय बुलेट ट्रेन…

त्यांच्या निधनाच्या पाच दिवस आधीच त्यांची पत्नी निर्मल यांचे देखील कोविडमुळे निधन झाले आहे. निर्मल यादेखील क्रिडापटू असून त्यांनी व्हॉलीबॉल खेळात भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केले आहे. त्या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारही राहिल्या आहेत.

मिल्खा सिंह यांच्या निधनाबद्दल समस्त भारत वासियांना हळहळ वाटत असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. “मिल्खा सिंह यांच्या जाण्याने आपण करोडो भारतीयांच्या मनात असलेला एक उत्तुंग क्रीडापटू गमावला आहे. त्यांच्या जाण्याने अतिशय दुःख होत आहे. काही दिवसांपूर्वीच मी मिल्खा सिंह यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ही आमची अखेरची बातचीत असेल असे वाटले नव्हते. त्यांच्या जीवन प्रवासातून देशातील अनेक क्रीडापटूंना प्रेरणा मिळेल.” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version