बेस्टमधून प्रवास करताना सध्याच्या घडीला सुटे पैसे दिल्यास कंडक्टर नाक मुरडत आहे. सध्याच्या घडीला बेस्टकडून एक नवीन फतवाच निघाला आहे. सुट्टे पैसे देऊ नका असे बेस्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. एरवी तेरवी बंदे पैसे दिल्यानंतर कंडक्टर सुटे नाहीत का असा प्रश्न विचारायचा. आता मात्र सुट्ट्यांची इतकी चलती झालीय, की बेस्टला सुट्टे पैसे नकोसे झालेले आहेत.
बेस्टचं किमान भाडं ५ रुपये झाल्यानंतर बेस्टच्या तिजोरीत सुट्या पैशांचा सुळसुळाट झाला आहे. हे सुट्टे पैसे बंदे करण्यासाठी बेस्टने ‘बंदे पैसे द्या, सुट्टे पैसे घ्या असे सुरु केलेले आहे. बेस्ट बसमधून प्रवास करताना सुटे पैसे दिल्यास प्रवासी आणि वाहकांचे वादही अलीकडे होऊ लागलेत. बेस्टचे रोजचे उत्पन्न सुमारे २ कोटी आहे. प्रवासी संख्या सुमारे २७ लाख इतकी आहे. तर किमान भाडे हे ५ ते २० रुपये इतके आहे.
प्रवाशांकडून सुट्टे पैसे न घेणारी बेस्ट सध्याच्या घडीला सुट्ट्या पैशांमुळे त्रस्त झालेली आहे. हाती असलेल्या नाण्यांचे करायचे काय असा प्रश्न बेस्टला पडलेला आहे. बेस्टच्या तिजोरीत सध्याच्या घडीला नाण्यांचा मोठा ऐवज जमा झालेला आहे. त्यामुळेच आता आगारातील ही नाणी नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला देण्याचा निर्णय बेस्टने घेतलाय. त्यामुळेच सध्याच्या घडीला बेस्टनेच त्यांच्या तिजोरीत जमा झालेली लाखो रुपयांची चिल्लर कोणतेही जादा दर, कमिशन न आकारता प्रवासी, व्यापारी, नागरिक, टोलनाके यांना देण्यासाठी काढली आहे. यासाठी प्रत्येक बेस्ट आगारातील रोखे आणि तिकीट विभागात कामकाजाच्या दिवशी ९.३० ते ३.३० दरम्यान जाऊन तुम्ही बंदे पैसे सुट्टे करुन घेऊ शकता.
हे ही वाचा:
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
‘आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी बाब’
उल्हासनगरमध्ये लोक छत्री घेऊन जात आहेत शौचालयात… वाचा काय आहे कारण?
बेस्टकडे दररोजच्या उत्पन्नातून तब्बल १०-१२ लाख रुपयांची १, २, ५, १० रुपयांची नाणी जमा झाली आहेत. ती नाणी कोणीतरी घ्यावी आणि त्या बदल्यात बेस्टला १००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या मोठ्या वजनदार नोटा द्याव्यात. याचाच अर्थ ‘कोणी चिल्लर घेता का चिल्लर’ असे उघड आवाहन मुंबईकरांना करण्यात आले आहे.