कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे समाजाच्या सर्वच घटकांवर त्याचा परिणाम झाला आहे. कोरोना निर्बंधांमुळे मंदिरे बंद असल्याने ऐन गणेशोत्सवात फूल विक्रेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ग्राहक कमी असल्याने माल विकला जात नाही आणि दोन ते तीन दिवसांनी फुले खराब होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मंदिरे अद्यापही उघडण्यात आलेली नाहीत. वटपौर्णिमेपासून उत्सवांना सुरुवात झालेली असतानाही मंदिरे बंद असल्यामुळे त्याचा सर्वात मोठा परिणाम फूल विक्रेत्यांवर झाला आहे. श्रावण महिन्यापासून हिंदू उत्सवांना सुरुवात होते. या उत्सवांदरम्यान फुले, हार यांना मोठी मागणी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद आणि निर्बंधांमुळे या व्यवसायाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
हे ही वाचा:
पंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान
कोस्टल रोड ठरतोय ‘कॉस्टली’; शेलारांकडून घोटाळ्याचा आरोप
शिवमंदिरात जाताना बांधकाम व्यावसायिकाला मारले ठार
… तर जावेद अख्तरना शबानासोबत पानाची टपरी लावावी लागली असती
कोरोना काळात शिथिलता आणली असली तरी मंदिरांना टाळे आहे, त्यामुळे ग्राहक कमी आहेत. फुलांची विक्री होत नाही आणी परिणामी फुले खराब होऊन नुकसान होत असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या २० वर्षांत आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नव्हता. गेल्या वर्षापासून कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मंदिरे बंद आहेत त्याचा मोठा फटका आमच्या व्यवसायाला बसला आहे. दिवसाला दहा हार विक्री होणेही कठीण आहे, असे घाटकोपरमधील भटवाडी परिसरातील संदीप जाधव यांनी सांगितले. २५ वर्षांपासून हा व्यवसाय करत असून सध्या कोरोनामुळे लोकांच्या घरीही हार देण्यास जाता येत नाही. फुले दोन दिवस टवटवीत राहतात; मात्र त्यानंतर फुले कोमेजून जातात. मंदिरे सुरू होतील तेव्हा चांगले दिवस येतील, असे घाटकोपरमधील गणेशनगर परिसरातील फूल विक्रेते वामन पानसरे यांनी सांगितले.