मालाड- मालवणी मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता अवैध बांधकामांची चर्चा मुंबईमध्ये जोरात होऊ लागलेली आहे. मुंबईमधील अवैध बांधकामांना सर्वाधिक परवानगी ही कोरोना काळात दिली गेल्याचे आता समोर आलेले आहे. याच टाळेबंदीमध्ये धारावीमध्ये अनेक बैठ्या घरांचे दोन मजले झालेले आहेत. पालिका प्रशासन मात्र हे काम सुरु असताना कुंभकर्णी निद्रेत होते.
टाळेबंदी आणि कडक निर्बंध लागू असताना वांद्रे येथील बेहरामपाडय़ापाठोपाठ आता धारावीतही बैठ्या घरांवर इमले चढू लागले होते. बैठ्या घराचे बांधकाम सुरू असताना, पालिका प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळेच सध्याच्या घडीला तोंडदेखल का होईना धारावीमधील सुमारे १५० बैठ्या घरांवरील अनधिकृत मजले हेरून पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित
भारतीय हवाई दल घालणार ‘आकाश’ ला गवसणी
आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही
गढूळ पाण्यामुळे लोकांची वाढली चिंता
धारावीमध्ये अनेक बैठय़ा घरांचे रुपांतर दोन ते तीन मजल्यांमध्ये झालेले आहे. त्यामुळेच आता पालिकेला कारवाई करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कामाला वेग आला त्याच दरम्यान अवैध बांधकामे जोरात सुरू झाली. आजच्या घडीलाही अवैध बांधकामे सुरूच आहेत. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये पालिकेकडे १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी अवैध बांधकामाच्या आलेल्या आहेत. वर्षभरात एकूण ९ हजार बांधकामांची नोंद याठिकाणी झालेली आहे. अनधिकृत झोपड्यांच्या उंची तर दोन मजल्यांच्या घरांइतक्या होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का असाच प्रश्न पडतो.
गेल्या सव्वा वर्षात अनधिकृत बांधकामासंदर्भात तब्बल १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारींची नोंद झालेली आहे. सर्वाधिक अवैध बांधकामे मुंबईतील चेंबूर एम, चेंबूर एम पश्चिम, कुर्ला एल, विक्रोळी एस, कांदिवली आर – उत्तर या ठिकाणी खुलेआम झालेली आहेत. गेल्यावर्षी टाळेबंदीच्या दरम्यान कुठलेही बांधकाम सुरु नव्हते. परंतु त्यानंतर मात्र अनधिकृत बांधकामांना पेव फुटल्याचा आकडाच आता समोर आलेला आहे.