उत्तराखंडमध्ये जोशीमठाजवळ चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला. या महापूरामुळे धौलगंगा आणि ऋषिगंगा नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि इतर संस्थांतर्फे बचाव कार्याला सुरूवात झाली आहे.
ऋषिगंगा आणि धौलगंगा या नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने या नद्यांच्या काठावरील गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. त्याबरोबरच उत्तर प्रदेश सरकारने देखील गंगेच्या काठावरील जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याबरोबरच एनटीपीसीचा तपोवन- विष्णुगड जल विद्युत प्रकल्प आणि ऋषिगंगा जल विद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले आहे.
कालपासून बचाव कार्याला सुरूवात झाली. या दोन्ही प्रकल्पावरील किमान १० लोक मृत्युमूखी पडले असल्याची आणि १२५ लोक बेपत्ता झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमिटी (एनसीएमसी) नुसार पाण्याची पातळी ओसरल्यामुळे खालच्या बाजूच्या गावांना आता पुराचा धोका नसल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी या अपघतात मृत्युमूखी पडलेल्या लोकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा नुकसानभरपाई मंजूर केली आहे, तर त्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याव्यतिरिक्त दोन लाख रुपयांची नुकसानभरपाकई देण्याचे कबूल केले आहे.