चिपळूण, सातारा, सांगली बरोबरच पुन्हा एकदा कोल्हापुरलाही पुराने वेढले आहे. जोरदार पावसामुळे बरसत असल्यामुळे जिल्ह्यात महापुराची भीती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केल्याने जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आल्यामुळे चार राज्य मार्गासह बहुसंख्य जिल्हा मार्गही बंद झाले आहेत.
जिल्ह्यातील १०५ बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरात पाणी घुसल्याने मदत कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखल झाली आहेत. कोल्हापूर ते गगनबावडा, मलकापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर ते राधानगरी, गडहिंग्लज ते गारगोटी या प्रमुख मार्गासह जिल्ह्यातील इतरही अनेक रस्ते बंद झाले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात पाणी शिरू लागल्यानंतर सर्वसामान्यांनी आपापल्या सुरक्षिततेचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या गाड्या सुरक्षित स्थळी हलविणे, घरात आवश्यक अन्नपदार्थांचा साठा करून ठेवणे, औषधांची व्यवस्था करणे हे सगळे वेगाने सुरू झाले आहे. पाणी कोणत्याही क्षणी घराजवळ पोहोचेल हे लक्षात आल्याने आता २०१९ला झालेल्या पुरासारखी स्थिती होऊ नये याची काळजी लोक घेताना दिसून येत आहेत.
हे ही वाचा:
तळई येथील दुर्घटनाग्रस्तांना मोदींनी दिला मदतीचा हात
लोकल सुरू करा! भाजपाचे सविनय नियमभंग आंदोलन
चिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. गुरुवारी दिवसभरही पाऊस धो धो कोसळत होता. या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. बहुतेक सर्व धरणे भरत आली असून धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक रस्तेही बंद झाले आहेत.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदी आता इशारा पातळी ओलांडून पाणी धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. रात्री १० नंतर धोका पातळीही ओलांडण्याची चिन्हे आहेत. अनेकांना बोटीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाल्याने एनडीआरएफची दोन पथके दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. चिखली, आंबेवाडी, कळे, बाजार भोगाव, वाघवे येथे या पथकाने मदत कार्य सुरू केले आहे.
राधानगरी धरणातून १४२५ क्यूसेस पाणी बाहेर पडत असून इतर सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून नदीकाठच्या गावांतील लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.