राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्या सध्या चंद्रपुर शहरामध्ये पूराने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे इरई धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे सात पैकी दोन दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक नागरिक घरात अडकले असून पुरातून १४० लोकांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. राजनगर आणि सहारा पार्क भागात इरई नदीचे पाणी शिरले असून या भागातील घरांना आठ ते दहा फूट पाण्याचा वेढा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने पूरग्रस्त भागातून लोकांना काढण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेस म्हणे महाभारतातही लव्ह जिहाद… हिमंतांनी घेतला खरपूस समाचार
दोन व्यापाऱ्यांची हत्या; मृतदेह जाळून वर्धा नदीत टाकले
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांना सोडणार नाही
ट्रेन ९० मिनिटे लवकर आली अन् पाच मिनिटांत सुटली, ४५ प्रवासी राहिले मागे
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे पैनगंगा- वर्धा नदीपट्टा, माणिकगड डोंगर आणि सखल मैदानी प्रदेशातील शेत पिकांना याचा फटका बसला आहे. अनेक मार्ग ठप्प पडले असून गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील थिपा, आवारपूर, हिरापूर अंतरगाव, सांगोडा, वनोजा आदी गावालगतच्या शेत शिवारातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला आदी पिकाचे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आला आहे.