चाळीसगावात पूरस्थिती, कन्नड घाटात कोसळली दरड

चाळीसगावात पूरस्थिती, कन्नड घाटात कोसळली दरड

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिह्यातील चाळीसगाव भागात ढगफुटी झाली आहे. काल रात्रीपासूनच चाळीसगाव मध्ये धुवाधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. हा चाळीसगाव मधील आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पाऊस असल्याचे स्थानिकांकडून म्हटले जात आहे. या ढगफुटी सह दरड कोसळण्याची घटनाही समोर आली आहे. तर या दरड कोसळल्याने कन्नड घाट बंद होऊन वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला धुवाधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यातील पाटणा आणि आजूबाजूच्या पाच गावांमध्ये पावसाचा हाहाकार सुरू असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटणा हे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध असे तिर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ आहे.

सोमवार, ३० ऑगस्टच्या रात्री पासूनच अखंड सुरू असलेल्या पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. तालुक्यातील पाटणा गावच्या परिसरातून गिरणा ही नदी वाहते. पावसामुळे या नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली. तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळेही या नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे समजते. या संपूर्ण परिस्थितीमुळे पाटणा आणि आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या गावांमध्ये पाणी साचले असून गावातील परिसर पाण्याने वेढला गेला आहे. तर ही परिस्थिती बघता गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

दरम्यान या पावसामुळे दरड कोसळण्याची घटनाही समोर आली आहे. जळगाव आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कन्नड घाटात ही घटना घडली. कन्नड घाटातील रस्ता आधीपासूनच अरुंद अशा स्वरूपाचा होता. वादळी पावसामुळे वाहतुकीसाठी तो धोकादायक बनला होता. त्यात आता दरड कोसळल्याची घटना समोर आल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर यामुळेच परिसरात वाहतूक कोंडीही पाहायला मिळत आहे.

Exit mobile version