पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या दुर्घटनेत पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत तर या घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून हा अपघात झाल्याचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले. त्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व कामगार परराज्यातील असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले. स्लॅब टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, शिवाय सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हे ही वाचा:

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!

राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

मुंबई पालिकेस दिवाळखोरीकडे नेणारा अर्थ (?) संकल्प!

घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने चार गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. या बचावकार्यामध्ये स्थानिक रहिवाशांनीही पुढे येऊन मदत केली. अनेकांनी अग्निशमन दलाच्या गाड्या येण्याआधी मदतीसाठी तातडीचे प्रयत्न सुरु केले होते. जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला, अशी माहिती अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version