गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच ग्राहकांना सतत उलट्या होत असून त्यांच्या तोंडातून रक्तही वाहात असल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
अमित कुमार हे त्यांची पत्नी आणि मित्रांसोबत गुरुग्राममधील सेक्टर ३० येथील ला फॉरेस्टा कॅफे येथे गेले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना माऊथ फ्रेशनर्स दिले. त्यानंतर लगेचच त्यांची तब्येत ढासळली. ज्यांनी माऊथ फ्रेशनर खाल्ले, त्यांना लगेचच उलट्यांचा त्रास होऊ लागला तसेच, त्यांच्या तोंडातून रक्तही येऊ लागले. इतका त्रास होत असूनही रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाने त्यांना मदत केली नाही आणि नामानिराळे राहिले, असा दावा अमित कुमार यांनी केला आहे.
हे ही वाचा:
फ्रान्समध्ये महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार बहाल
सनातन धर्मावरील टिपण्णीवरून स्टॅलिनना न्यायालय म्हणाले, तुम्ही काय बोलता तुम्हाला कळते का?
भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली
१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!
याबाबत या ग्राहकांनीच मग गुरुग्राम पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तिथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.