‘प्रोजेक्ट चित्ता’ या मोहिमेंतर्गत दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या पाच चित्त्यांना (ज्यात तीन मादी आणि दोन नरांचा समावेश आहे) जूनमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यामध्ये मुक्त वातावरणात सोडले जाणार आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी सांगितले. सामान्यतः पावसाळ्यात प्राण्यांना जंगलात सोडले जात नाही. पावसाळ्यातील कठोर हवामानामुळे त्यांना अन्न आणि निवारा शोधणे तसेच, त्यांच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेणे कठीण होते. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन तज्ज्ञांच्या पथकाने हा निर्णय घेतला आहे.
चित्त्यांना अभयारण्याच्या बाहेर जाण्याचीही परवानगी दिली जाईल. त्यांनी त्यांच्यासाठी धोकादायक असणाऱ्या भागात प्रवेश करेपर्यंत त्यांना पुन्हा ताब्यात घेतले जाणार नाही, असे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. अभयारण्यात जंगल नसलेले एक क्षेत्र असून तिथे आवश्यक व्यवस्थापन यंत्रणेचा अभाव असल्याने हे ‘धोक्याचे क्षेत्र’ म्हणून गणले जाते. आत्तापर्यंत, नामिबियातून आणलेल्या आठपैकी चार चित्त्यांना कुंपणाने बंदिस्त असलेल्या शिबिरांमधून अभयारण्यातील मुक्त परिस्थितीत सोडण्यात आले आहे.
हे ही वाचा:
“‘सामना’मधील अग्रलेखाला महत्त्व देत नाही”
युद्धाचे ढग गडद! रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला
सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया विद्यापीठाचे पशुवैद्यकीय वन्यजीव विशेषज्ञ, तेथील चित्ता प्रकल्पाचे व्यवस्थापक, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य तज्ज्ञ कमर कुरेशी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे वन महानिरीक्षक अमित मल्लिक यांनी ३० एप्रिल रोजी कुनो अभयारण्याला भेट दिली होती. त्यांनी सर्व चित्ते चांगल्या शारीरिक स्थितीत असून नैसर्गिक कृती करत असल्याचे म्हटले होते. चित्त्यांची वर्तणूक आणि संपर्क क्षमतेच्या आधारावर या पाच चित्त्यांची निवड करण्यात आली असून उर्वरित चित्ते शिबिरांमध्येच राहणार आहेत. या चित्त्यांच्या सुलभ वावरासाठी अंतर्गत दरवाजे उघडे ठेवले जातील. त्यामुळे त्यांना अधिक जागा वापरता येईल आणि विशिष्ट नर आणि मादी यांच्यातील परस्परसंवाद घडण्यासाठीही मदत होईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.
पावसाळ्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि चित्ता संवर्धनानुसार कुनो अभयारण्य किंवा आजूबाजूच्या भागांत त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल.