जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागात सोमवार, ८ जुलै रोजी लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले आहेत. कठुआ येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबाविण्य्त येत आहे.
जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागातून लष्कराचे वाहन जात असताना अचानक या वाहनावर गोळीबार करण्यात आला. माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. शिवाय या दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडही फेकले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबविण्यात आली आहे. सुरुवातीला सहा जवान जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर काही वेळाने पाच जवान हुतात्मा झाल्याची बातमी समोर आली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींचे रशियात जंगी स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित!
वरळी अपघात प्रकरण – मिहीर शहा विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी!
काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घरातील कपाटाच्या मागे खोदला होता बंकर
वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शाह यांना जामीन मंजूर !
कठुआ जिल्ह्यात मागील दोन दिवसांत दहशतवाद्यांबरोबरील ही तिसरी चकमक असून महिनाभरातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, तोपर्यंत दहशतवादी जंगलात आत पळून गेले. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.