ओदिशामधील रेल्वे अपघाताच्या चौकशीला सीबीआयकडून सुरुवात झाली आहे. सीबीआयच्या पथकाने दक्षिण पूर्व रेल्वेच्या पाच कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये बहनागा बाजाराच्या असिस्टंट स्टेशन मास्तरचाही समावेश आहे. त्यांनी देखभाल-दुरुस्तीनंतर चाचण्यांच्या नियमांचे पालन केले नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे.
सीबीआय ओदिशा अपघाताची विभिन्न कोनांतून चौकशी करत आहे. या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीबीआयने साहाय्यक स्टेशन मास्तर एसबी मोहंती आणि सिग्नलची देखभाल करणाऱ्या चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल मेन्टेनर रेल्वे सिग्नलिंगची देखरेख करतात. हे कर्मचारी २ जून रोजी सिग्नलच्या देखभालीसाठी बहानगा येथे आले होते. नियमानुसार, सिग्नलच्या देखरेखीनंतर त्यांना ऑन ड्युटी साहाय्यक स्टेशन प्रबंधकांसोबत सिग्नलचे परीक्षण करणे अपेक्षित होते. मात्र ते सिग्नल आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंग सिस्टीमच्या परीक्षणाआधीच निघून गेल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. नियमानुसार, स्टेशन मास्तरांनी या सिग्लनची तपासणी प्रत्यक्ष करणे अपेक्षित होते.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली भक्कम युती आहे!
‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!
आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग
याआधी सीबीआयने बहानगा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे सर्व मोबाइल फोन, लॉग बुक जप्त केले आहेत. सिग्नल, पॉइंट, ट्रॅक सर्किट, क्रॅक हँडल, एलसी गेट, सायडिंग आदींच्या भौगोलिक स्थितीनुसार, संकेत देणाऱ्या रिले इंटरलॉकिंग पॅनललाही त्यांनी सील केले आहे. रिले इंटरलॉकिंग पॅनलला सील केले गेल्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही प्रवासी अथवा मालगाडी बहानगा रेल्वे स्थानकावर थांबू शकणार नाही. त्यामुळे सीबीआयचे अधिकारी साहाय्यक स्टेशन मास्तर तसेच, सिग्नल मेन्टेनरच्या हलगर्जीची चौकशी करत आहेत. सीबीआयचे अधिकारी कोरोमंडल एक्स्प्रेसचे लोको पायलट आणि साहाय्यक लोको पायलट यांचीही चौकशी करू शकतात. या दोघांवर सध्या भुवनेश्वरमधील रुग्णालयात उपचार सुरूआहेत.