मच्छिमारांवर महानगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मच्छिमारांनी पुकारलेल्या आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मच्छिमार उपस्थित झाले होते. यावेळी जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. तौक्ते चक्रीवादळामुळेही मच्छीमाराचे चांगलेच कंबरडे मोडले होते. तसेच ओएनजीसीचा सर्वेमुळे मच्छिमारांचेही मोठे नुकसान झालेले होते. अशा विविध मागण्यांसाठी तसेच मासळी बाजार पूर्वीच्या जागीच हलवावा, अशा मागण्यांसाठी सर्व मच्छिमार बांधव आझाद मैदानाच्या ठिकाणी एकत्र जमले होते.
या मोर्चामध्ये मच्छिमारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाविरोधत घोषणा बाजी केली. यामध्ये डहाणू, सातपाटी, उत्तन, वसई, पालघर, बोईसर, रायगड, कुलाबा, माहीम, खार दांडा, वरळी, ठाणे, भांडुप, पनवेल, नवी मुंबई इत्यादी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मच्छिमार बांधव सहभागी झाले होते.
क्राफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई आणि दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईवर केलेल्या षडयंत्रांच्या विरोधात मच्छिमार एकजूट झाले असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती चे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी सांगितले. मच्छीमारांची एकच मागणी आहे की, आमच्या हक्काच्या हिसकावलेल्या जमिनी आणि मासळी मंडई आम्हाला परत हवी आहे. तसेच जर शासनाने आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल येत्या दहा दिवसात घेतली नाही तर पंधराव्या दिवशी उग्र आंदोलन करून झोपलेल्या सरकारला दणका देणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा
खळबळजनक! आग्रीपाड्यात बोर्डिंग स्कूलमध्ये २६ मुले कोरोनाबाधित
राष्ट्रकुल सुवर्ण विजेते,महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख कालवश
कॅमेरामन सौंदडे यांचे म्युकरमायकोसिसमुळे निधन
मोर्चात सामील झालेल्या शिष्टंडळाने उपआयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. सदर बैठकीत पवार यांच्याकडून आश्वासन देण्यात आले आहे. मच्छिमारांची क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी मंडई संदर्भातील आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीला आणि दादर येथील मासळी मंडईच्या महिलांना पुन्हा त्याच जागी पुनर्वसन करण्याच्या मागणीला वरिष्ठांकडे सोपवण्यात येईल. मच्छिमारांनी या बैठीत नाराजी व्यक्त करत पालिकेच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका करताना आयुक्तांनी शिष्टमंडळाला भेट दिली नसल्याची नाराजी देखील बैठकीत व्यक्त केली.