स्त्री शक्तीचा जागर: पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे

स्त्री शक्तीचा जागर: पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे

नवरात्री म्हटलं की स्त्री शक्तीची रूपे आठवतात. धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, करारी बाणा, नेतृत्व अशा अनेक गुणांचे स्त्री रुपात दर्शन होत असते. या अशाच सर्व रूपांचं प्रतिबिंब दिसतं उमाबाई दाभाडे यांच्या रुपात. मराठी साम्राज्यातील पहिल्या महिला सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांना ओळखले जाते.

छत्रपतींसाठी आणि पेशव्यांसाठी आपला जीव देणाऱ्या अनेक सरदारांच्या, मावळ्यांच्या पराक्रमाने मराठ्यांचा इतिहास उजळून निघाला आहे. यातलंच महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणं म्हणजे पुण्यातील तळेगावचं दाभाडे घराणं. या घराण्याचे बजाजी आणि त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. पुढे छत्रपती संभाजी राजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली. तसेच ते राजाराम महाराजांच्या सेवेतही दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन अपत्ये होती. तर खंडेरावांना त्रिंबकराव आणि यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी होते. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल आणि नंतर सेनापतीपदी नेमलं. खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड आणि गुजरात या तीनही प्रांतावर आपली पकड घट्ट केली. खंडेराव यांच्या मृत्यूनंतर त्रिंबकराव यांना सेनापतिपद मिळालं. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्यांकडून त्रिंबकराव मारले गेले आणि येथूनच खंडेरावांची पत्नी आणि त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा पेशव्यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. अत्यंत कठीण अशा सेनापतीपदाची जबाबदारी वीस वर्षे त्यांनी मोठ्या धीराने निभावली. राजकारण डावपेचांसोबत त्या प्रत्यक्ष युद्धभूमीवरही लढल्या.

उमाबाईंचा जन्म सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असणार्‍या अभोणा गावातील. त्यांच्या माहेरी सरदारकी असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्यात लढवय्येपणा आणि कणखरपणा होता. लहान वयात राज्यकारभारातील घडामोडी त्या जाणून होत्या. शस्त्र चालवण्यात आणि घोडेस्वारीत त्यांनी प्राविण्य मिळवले होते. त्यांचा विवाह पुण्याजवळील तळेगावचे वतनदार खंडेराव दाभाडे यांच्याबरोबर झाला. तळेगावच्या दाभाडे यांचं घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या सैन्यात होतं. खंडेराव दाभाडे यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आणि शाहू महाराजांनी १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांना सेनापतीपदी नेमलं. १७२९ मध्ये खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले. पुढे त्यांचे पुत्र त्रिंबकराव हे ही लढाईत मारले गेले. पती आणि ज्येष्ठ मुलाच्या निधनाने आणि बाकी मुले लहान असल्याने वतनाची जबाबदारी उमाबाईंच्या अंगावर पडली आणि ती त्यांनी समर्थपणे पेलली.

सेनापतीपदावर बसलेल्या महिलेला कमी लेखून मारवाडचा राजा अभयसिंग याने मुघलांची मदत घेत चाल केली. पण, उमाबाई आल्या परिस्थितीला शरण न जाता हिंमतीने सामोर्‍या गेल्या. उमाबाई स्वतः युद्धात उतरल्या आणि त्यांनी थेट अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंनी त्या युद्धात पराक्रम गाजवत विजय मिळवला. शेवटी अभयसिंगला गुजरातमधून पलायन करावे लागले. बडोदा आणि डभई हे प्रांत तर उमाबाईंच्या ताब्यात आले होते. परंतु, अहमदाबाद येथे अजूनही मुघलांचे ठाणे अस्तित्वात होते. त्यामुळे उमाबाईंनी पुन्हा एकदा गुजरातवर दुसरी स्वारी केली. तिकडचा मुघलांचा सरदार जोरावर खान बाबी याने उमाबाई यांना पत्र लिहून त्यांना कमी लेखण्याची चूक केली. जोरावर खानच्या पत्राला उमाबाईंनी थेट राणांगणात उतरून चोख उत्तर दिलं. जोरदार हल्ल्यामुळे मुघल सैन्य बिथरलं आणि जोरावर खान तर लपून बसला. पुढे उमाबाईंनी अहमदाबाद ताब्यात घेतलं. त्यांच्या या शौर्यामुळे खूश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाई यांचा मोठा सन्मान केला.

हे ही वाचा : 

ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट

काँग्रेसचे म्हणजे जिंकता येईना ईव्हीएम वाकडे

धक्कादायक! नौशाद आणि हसन अलीकडून चहात थुंकीचा प्रकार!

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या ‘सिमेंट स्लीपर’

पुढे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बरीच बदलली. नानासाहेब पेशवे सर्व कारभार बघत होते. सरदार मंडळी प्रबळ होऊन आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत होते. उमाबाईंचा अधिकार कमी करून त्यांचा मुलुख कमी करण्याचा प्रयत्नही अनेकजण पेशवाईत करत होते. पण, उमाबाई ठाम होत्या. त्या आपला मुलुख कमी करून देण्यास तयार नव्हत्या. त्यांच्याकडे राजकीय डावपेच खेळण्याचे कौशल्य होते. पेशाव्यांसोबत वाटाघाटी करायला त्या स्वतः बसल्या होत्या. आपला मुलुख सोडून देण्याऐवजी आपल्याकडून पैसा घ्यावेत, असा विचार उमाबाईंनी नानासाहेबांसमोर ठामपणे मांडला. परंतु नानासाहेबांनी उमाबाईंचा प्रस्ताव स्वीकारला नाही. पेशव्यांच्या या अन्यायामुळे उमाबाई नाराज झाल्या आणि त्या रामराजे भोसले यांच्या गादीस जाऊन मिळाल्या. त्यांनी दामाजी गायकवाड यांना पेशव्यांवर चाल करून पाठवले. या युद्धात दामाजी गायकवाड यांचा पराभव झाला. नाईलाजास्त त्यांना १७५१ साली पेशव्यांबरोबर वेणेचा तह करावा लागला. त्यात त्यांना गुजरात प्रांत पेशव्यांचा स्वाधीन करावा लागला. तर त्याचं साली पेशव्यांनी उमाबाई दाभाडे आणि त्यांच्या कुटुंबियांना कैद करून होळकर वाड्यात ठेवलं. पुढे सिंहगडावर नजरकैदेत ठेवलं. पुन्हा एप्रिल १७५२ साली पेशवे आणि दाभाडे यांच्यात तह झाला. त्यामध्ये उमाबाईंनी छत्रपती रामराजे गादीला अनुकूल न होता शाहू महाराजांच्या राज्यमंडळाचे प्रधान असलेल्या पेशव्यांना अनुकूल राहावे, असे ठरले. यानंतर पेशव्यांनी उमाबाई यांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना सन्मानाने परत केला. या तहामुळे पेशवे आणि दाभाडे यांचे संबंध पुन्हा सुधारले. पुढे उमाबाईंची प्रकृती बिघडत गेली. १७५३ साली त्यांचे निधन झाले. पण, मराठ्यांच्या इतिहासातील पहिल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचं धैर्य, शौर्य हे त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन देतात. अशा या स्त्री शक्तीला नमन!

Exit mobile version