भारताच्या इतिहासातील राण्या केवळ सौंदर्याचे प्रतिक नसून, हातात तलवार आली की महाकालीचे रौद्ररूप सुद्धा धारण करतात. इतिहासातील प्रत्येक पान अशा महिलांच्या शौर्याच्या, बलिदानाच्या घटनांनी भरलेले आहे. आज आपण अशाच एका शूर महिलेची शौर्यगाथा पाहणार आहोत, ज्यांनी जन्मभूमीच्या संरक्षणासाठी आणि इंग्रजांच्या सर्वनाशासाठी तलवार उचलली. याच स्त्रीच्या प्रभावामुळे झाशीच्या राणीने इंग्रजांचे कंबरडे मोडले होते, अशा या मर्दानी महिला योद्ध्याचे नाव आहे ‘भीमाबाई होळकर’.
भीमाबाईंचा जन्म १७ सप्टेंबर १७९५ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी महाराज यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खून केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातून निसटुन जावे लागले. त्यानंतर शिंद्यांनी नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. अखेर यशवंतरावांनी २५ ऑक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करून शिंदे व पेशव्यांचा दणदणीत पराभव करत त्यांची सुटका केली.
सुटकेनंतर यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षणाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. भीमाबाईला शिक्षणाचे धडे देत लढवय्या बनविले, विशेष म्हणजे त्याकाळी ही एक क्रांतीकारक घटनाच होती. त्यानंतर भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य आले. यानंतर त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरू केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अश्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातून यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता, त्यात मुख्य भूमिका भीमाबाई बजावत होत्या.
याच दरम्यान, इंग्रजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराज यशवंत होळकर यांचा १८११ मध्ये भानपुरा येथे अकाली मृत्यू झाला. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर माळवा तसेच इंदूर प्रांतात संकटांचे काळे ढग पसरत होते. याच संकटांचा सामना यशवंतरावांची मुलगी मर्दानी भीमाबाई होळकर यांनी केला. २० डिसेंबर १८१७ रोजी सर थॉमस हिस्लोप आपल्या इंग्रज सैन्यासोबत महिदपुरकडे कुच करत होता, याच वेळी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी भीमाबाई आणि मल्हारराव (तिसरे) युद्धाच्या उतरले होते. त्यावेळी मल्हाररावाचे वय फक्त बारा वर्ष होते तर भीमाबाईचे वय वीस वर्ष होते.
हे ही वाचा :
महारावांचा नक्षा उतरविणारे शिरवडकर ‘न्यूज डंका’ वर |
ठाकरेंकडे मतं आहेत कुठे? काँग्रेसचा मुस्लीम मतदार त्यांना मतं देतो|
उकळत्या चहाचे भांडे तोंडावर फेकल्याचा व्हीडिओ पण पोलीस म्हणतात तक्रारच नाही
या युद्धात जाओरा नगरचे जागीरदार गफुरखान यांनी देखील पाठींबा दिला होता. दोन्ही बाजूने युद्ध सुरु होतं, विजयी आपल्याकडेच होता मात्र, येईन ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघून गेला. याठिकाणी इंग्रजांची कुटनीती समोर आली. गफुरखानला जाव-याची जहागिरी देण्याचे आमिष दाखवत इंग्रजांनी फोडले होते. हाती आलेला विजय त्याच्या गद्दारीमुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
या युद्धानंतर मल्हाररावाला इंग्रजांशी मंदसोर येथे तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटल्या होत्या. इंग्रजांशी त्यांचा लढा थांबणार नव्हता.त्यांनी माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरू केले. इंग्रज खजिने लुटले, अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करून असे झोडपले की माल्कमलाच पळून जावे लागले. अशाच वेळी इंग्रजांनी पुन्हा कूटनीतीचा अवलंब केला. भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यानंतर इंग्रजांनी पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडून जावू लागले.
आपल्या पित्याप्रमाणेच भीमाबाईने भारतातील संस्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळून भीमाबाईच्या सर्वनाशासाठी माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे असा आपला मुक्काम हलवत होत्या. तिने इंग्रजी तळांवर अचानक हल्ले करून लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेत भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करून घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पडला. यावेळीस दुर्दैव असे की, एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडून निघून गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे २८ नोव्हेंबर १८५८ मध्ये भीमाबाईंचा मृत्यू झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच मृत्यू असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले.