१०० जणांनी घेतली लस
ठाण्यातील `अर्पण फाऊंडेशन’च्या अध्यक्षा भावना डुंबरे आणि भारतीय जनता पार्टीचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांच्या माध्यमातून ठाण्यातील गृहसंकूलात पहिले लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. अपोलो क्लीनिकच्या माध्यमातून हिरानंदानी इस्टेट येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. गुरुवार, ३ जून रोजी सुरु झालेल्या या लसीकरण केंद्रावर पहिल्याच दिवशी १०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
ठाणे महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे शेकडो नागरिकांना संधी मिळत नाही. त्यातच महाराष्ट्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास स्थगिती दिली. त्यामुळे हजारो नागरीक लसीकरणापासून वंचित होते. ठाणे महापालिकेने खासगी हॉस्पिटल आणि कंपन्यांना लसीकरणासाठी परवानगी दिल्यात आली. त्यानंतर अर्पण फाऊंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे आणि भाजपाचे ठाणे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी खासगी हॉस्पिटलमार्फत हिरानंदानी इस्टेट या गृहसंकुलात लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्न केले.
त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अपोलो क्लिनिकच्या माध्यमातून हिरानंदानी इस्टेट क्लब हाऊसमध्ये गुरुवार, ३ मे पासून लसीकरण सुरू झाले. ठाणे शहरातील गृहसंकूलात सुरू होणारे हे पहिले लसीकरण केंद्र ठरले आहे. या केंद्रातील लसीकरणाचे उद्घाटन भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनोहर डुंबरे, भावना डुंबरे यांची उपस्थिती होती.