नौदलाच्या ताफ्यातील ‘वाघशीर’ ही सर्वाधिक जलद सज्ज झालेली पाणबुडी आहे. अवघ्या १३ महिन्यात सज्ज होऊन या पाणबुडीच्या समुद्री चाचण्यांना शुक्रवारी सुरुवात झाली आहे. ‘वाघशीर’ ही कलवरी वर्गातील अखेरची पाणबुडी आहे.भारतीय नौदलासाठी विविध प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबु्ड्यांच्या बांधणीचे काम देशातील विविध गोदींमध्ये युद्धपातळीवर सुरु आहे. गेल्या काही वर्षात अत्याधुनिक युद्धनौकांच्या समावेशामुळे नौदलाची ताकदीत मोलाची भर पडली आहे, पडत आहे.फ्रान्स देशाच्या स्कॉर्पिन पाणबुड्यांचे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरीत करत कलवरी वर्गातील सहा पाणबुड्यांची बांधणी गेली काही वर्षे सुरु होती.
त्यापैकी पाच पाणबुड्या या नौदलात दाखल झाल्या असून सहावी आणि शेवटची पाणबुडी Vaghsheer च्या खोल समुद्रातील चाचण्यांना आता सुरुवात झाली आहे.केंद्र सरकारी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या कारखान्यात कलवरी श्रेणीत सहा पाणबुड्यांची बांधणी करण्यात आली.त्यातील पाच पाणबुडी नौदलाने आपल्या ताफ्यात घेतल्या आहेत.२०१९ च्या आधी Vaghsheer पाणबुडीच्या बांधणीला मुंबईतील माझगाव गोदीत सुरुवात झाली होती. करोना काळामुळे या बांधणीला काहीसा उशीर झाला.सहाव्या पाणबुडीचे जलावतरण २२ एप्रिल २०२२ ला झाले होते. त्यांनतर आता १९ मे २०२३ रोजी या पाणबुडीच्या समुद्री चाचण्यांना नौदल व माझगाव डॉककडून सुरुवात झाली.
हे ही वाचा:
बराक ओबामासह ५०० अमेरिकन नागरिकांना रशियात ‘नो एन्ट्री’
ऋषी सुनक यांचे एका वर्षात २००० कोटींहून अधिक नुकसान !
सिद्धरामय्या यांनी शपथ घेतल्यानंतर राहुल गांधींनीही घेतली ‘शपथ’
केरळ स्टोरीने ‘छत्रपती’ आणि ‘पीएस २’ अशा चित्रपटांना टाकले मागे !
जलावतरण ते समुद्री चाचणी या दरम्यान अवघ्या १३ महिन्यात ही पाणबुडी सज्ज झाली.कुठलीही पाणबुडी त्याचे जलावतारण होताना त्यावर दिशादर्शक, शस्त्र प्रणाली, संवाद, रडार अशाप्रकारची सामग्री नसते.ही सामग्री जलावतरणानंतर समुद्री चाचण्या सुरु होण्याआधी बसविली जाते.त्यामुळे त्यात बराच कालावधी लागतो. हा कालावधी अनेकदा दोन वर्षांहून अधिक लागतो. कलवरी श्रेणीतील पहिल्या चार पाणबुडी याना दीडवर्षांहून अधिक काळ लागला होता.या आधीच्या ‘वागीर’ पाणबुडीचा हा कालावधी १४ महिने लागला होता.
यांच्या तुलनेत वाघशीर अवघ्या १३ महिन्यात सज्ज झाली आहे.येणाऱ्या काळात ‘वाघशीर’ ची आता सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे, रडार यंत्रणा, संपर्क यंत्रणा, आणीबाणीच्या काळातील परिस्थितीचा सामना करण्याची पाणबुडी आणि त्यातील नौसैनिकांची क्षमता अशा विविध चाचण्या केल्या जाणार आहेत. सर्व चाचण्या यशस्वी पार पडल्या तर पुढील वर्षी मार्च २०२४ पर्यंत Vaghsheer नौदलाच्या सेवेत दाखल होईल असा अंदाज आहे.कलवरी वर्गातील पाणबुड्या या डिझेल-इलेक्ट्रिक तंत्रावर चालणाऱ्या जगातील अत्याधुनिक पाणबुड्या समजल्या जात आहेत. सुमारे १६०० टन वजन आणि समुद्रात सलग ५० दिवस संचार करण्याची क्षमता या वर्गातील पाणबुड्यांमध्ये आहे.
‘सँडफिश’ वरून नामकरण
जलावतरणावेळी या पाणबुडीचे नाव ‘वागशीर’ होते.ते आता ‘वाघशीर’ करण्यात आले.नौदलाच्या सूत्रांनुसार, याच नावाची पाणबुडी आधीही ताफ्यात होती.त्यासंबंधी इतिहासाचा तसेच मूळ नावाचा नौदल मुख्यालयाने अभ्यास केला. मुख्यालयातील नामकरण समितीकडून यावर संशोधन करण्यात आले.त्यानंतर आता हे नाव ‘वाघशीर’ म्हणून निश्चित झाले आहे.इंग्रजीतील ‘सँडफिश’ नावाच्या माशावरून हे नामकरण करण्यात आले.