जगातील सर्वच देशांना अलर्ट वर आणणाऱ्या ओमिक्रोनचा शिरकाव आता हळूहळू भारतात होत असून ओमिक्रोनचा रुग्ण महाराष्ट्रात सापडला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण- डोंबिवली येथे राज्यातील पहिल्या ओमिक्रोन बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. डोंबिवलीतील ३३ वर्षीय तरुणाला ओमिक्रोनची लागण झाली असून तो २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला होता.
या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर हा रुग्ण ओमिक्रोन बाधित असल्याचे समोर आले. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला होता. त्याच दिवशी त्याला सौम्य ताप आला मात्र, इतर कोणतीही लक्षणे या रुग्णाला नव्हती.
हे ही वाचा:
दुसऱ्या कसोटीत किवींवर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व
कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री
ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?
रुग्णाला इतर कोणतीही लक्षणे नसल्याने हा रुग्ण कल्याण-डोंबिवलीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्याचा आजार सौम्य स्वरुपाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील ३५ जणांची कोरोना तपासणी केली असून सर्वांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तसेच या रुग्णाने दिल्ली ते मुंबई विमानप्रवास ज्या विमानाने केला, त्या सर्व २५ प्रवाशांची कोरोना तपासणी केली गेली आहे.
राज्यात जरी ओमिक्रोनचा प्रवेश झाला असला तरी नागरिकांनी घाबरू नये. आफ्रिकेतील अनुभवानुसार हे रूग्ण गंभीर आजारी नसतात, मात्र त्याचा फैलाव जलद आहे. म्हणून यावर खबरदारी घेणे, नियम पाळणे, हाच एकमेव उपाय आहे. एक रूग्ण सापडला म्हणून लॉकडाऊन लावणे, निर्बंध लावणे चुकीचे आहे, सध्या तरी असा तसा कोणताही विचार नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.