बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू

इरसालवाडी गावापर्यंत पोहचताना झाला मृत्यू

बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवार, १९ जुलै रोजी रात्री उशिरा दरड कोसळल्याची भीषण घटना घडली. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवराम ढूमणे असे अधिकाऱ्याचे नाव असून ते नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी येथील अग्निशमन दलाचे सहायक केंद्र अधिकारी होते.

घटनास्थळी पोहोचण्यासाठी मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाला असून ती एकमेव निमुळती वाट गावापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे मोठी यंत्र, जेसीबी अथवा इतर सामग्री वर नेण्यास अशक्य असणार आहे. पावसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यासाठी वर जात असताना दुर्दैवाने अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागून मृत्यू झाला.

हे ही वाचा:

दरड कोसळून गाव भुईसपाट

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

भारत- पाकिस्तान लढत २ सप्टेंबरला

वाशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, चिपळुणात अतिवृष्टी

सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून चार जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप १०० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर रात्री उशिरा दरड कोसळली. दरडीखाली ३० ते ४० घरं दबल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा आदिवासी पाडा असून यथे साधारण अडीचशे लोकं राहातात.

Exit mobile version