झाशीमध्ये अग्नितांडव; रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयातील घटना

झाशीमध्ये अग्नितांडव; रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये शुक्रवारी रात्री शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात ही आग लागली. नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात असून अधिकचा तपास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडून लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली. या आगीत होरपळून १० मुलांचा मृत्यू झाला तर, १६ जण जखमी झाले आहेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या NICU मध्ये शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. तर, दुसरीकडे नवजात अर्भक आणि रुग्णांना वाचवण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू होते.

“अतिदक्षता विभागातील बाहेरच्या वॉर्डमधल्या सर्व अर्भकांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. मात्र, आतल्या वॉर्डमध्ये असणाऱ्या १० अर्भकांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक रुग्णांनाही वाचवण्यात यश आलं आहे”, अशी माहिती झाशीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी दिली.

हे ही वाचा : 

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

पंतप्रधान मोदी भाजपाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद!

गृहमंत्री शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, म्हणाले, भाजपा सर्व नियमांचे पालन करते!

कॅनडामध्ये खलिस्तानी मोर्चात सामील झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला क्लीन चीट

दरम्यान, रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जात असून त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. “ही दुर्दैवी घटना काळीज पिळवटून टाकणारी आणि प्रचंड वेदना देणारी आहे. यासंदर्भात युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत,” असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version