मुंबई मधील करी रोड भागात भीषण आग लागली आहे. करी रोडमधील अविघ्न पार्क या इमारतीमध्ये हा अग्नितांडव सुरु आहे. अविघ्न पार्क या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरीही या आगीमुळे या इमारतीच्या आसपासच्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
शुक्रवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास करी रोड मधून ही आगीची घटना पुढे आली. अविघ्न पार्क या साठ माजली इमारतीला ही आग लागली आहे. या आगीमुळे या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनसाठाळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आपत्ती निवारणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
अविघ्न पार्क ही निवासी रहिवासी इमारत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या इमारतीत अडकल्याची माहिती पुढे येत आहे. तर या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अविघ्न पार्क ही इमारत रेल्वे स्टेशनला लागून असल्यामुळे या आगीच्या प्रकरणाने या परिसरात वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे. या घटनेची माहिती कळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
हे ही वाचा:
पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले
१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र
आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट
या अग्नितांडवात जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. पण या आगीतून वाचण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती गॅलरीच्या मार्गे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. पण या प्रयत्नात हा व्यक्ती तब्बल १५ मिनिटे लटकत होता आणि त्यानंतर तो खाली पडलेला पाहायला मिळाला.