विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयात भीषण आग लागली आहे. रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ही आग लागली आहे. अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट होऊन ही आग लागली. या अग्नितांडवात १३ रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
विरार पश्चिम येथील विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये ९० रूग्ण कोविडवर उपचार घेत होते. हाॅस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग होता. या अतिदक्षता विभागात एकूण १७ रूग्ण उपचार घेत होते. शुक्रवारी पहाटे तीन-सव्वा तीनच्या सुमारास अतिदक्षता विभागातील एसीच्या काॅम्प्रेसरचा स्फोट झाला आणि अतिदक्षता विभागात आग लागली. बघता बघता ही आग पसरत गेली.
हे ही वाचा:
विशाखापट्टणमहून महाराष्ट्राकडे निघाली ऑक्सिजन एक्स्प्रेस
पश्चिम बंगालमध्ये ७९.११% मतदान
पश्चिम बंगालमध्ये रोड शो वर बंदी
या आगीची माहिती मिळताच आग विझवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. पोलीस प्रशासनाची लोकं घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अग्निशमन दलाच्या एकूण १० गाड्या यासाठी प्रयत्नशील होत्या. अखेर ही आग विझवण्यात आली.
पण यात हाॅस्पिटलचा दुसरा मजला जळून बेचिराख झाला आहे. अतिदक्षता विभागातील १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अतिदक्षता विभागातील ४ रूग्ण आणि हाॅस्पिटलचे कर्मचारी हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले आणि बचावले. त्यापैकी २ रूग्णांची प्रकृती सध्या गंभीर आहे. सध्या या हाॅस्पिटलमधील रूग्णांना दुसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरम्यान विजय वल्लभ हाॅस्पिटलचे फायर ऑडिट झाले नव्हते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मार्च महिन्यात घाटकोपर येथील सनराईज हाॅस्पिटलला आग लागल्यानंतर राज्यातील हाॅस्पिटल्सच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पण पुढे त्याचे काहीही झाले नाही. विरारच्या दुर्घटनेनंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. त्याबरोबरच त्यांनी ट्वीटवरून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!
या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत.— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) April 23, 2021