राज्यात एकामागून एक रूग्णालयांना आगी लागण्याचे सत्र चालूच आहे. आधीच कोविडचे संकट असताना रुग्णालये देखील सुरक्षित नसल्याचे एकेका घटनेनंतर समोर येत आहे. आज मुंब्रा येथील एका खासगी रुग्णालयाला पहाटे आग लागली. या आगीत चौघांचा मृत्यु झाल्याचे समजत आहे.
मुंब्रा येथील ‘प्राईम क्रिटिकेअर’ या रुग्णालयात पहाटे ३.४० वाजता आग लागली. हे एक कोविड रुग्णांसाठी नसलेले रुग्णालय होते. ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस या रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. प्राथमिक माहितीनुसार मीटर रूममधून या आगीला सुरूवात झाली असावी.
हे ही वाचा:
सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण
नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांची वॉर्ड ऑफिसरला मारहाण
१० राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
आग लागल्यानंतर रुग्णालयाने तात्काळ सर्व रुग्णांना जवळच्या रुग्णालयांत दाखल केले. आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु या सर्व प्रकरणात ४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यास्मिन जफर सय्यद (४६), नवाब माजिद शेख (४७), हलिमा बी सलमानी (७०) आणि सोनावणे आडनावाचे कोणी एक गृहस्थ यांचा मृत्यु झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, मृतांच्या परिवारासाठी पाच लाख रूपये तर जखमींसाठी एक लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
राज्यात गेले काही दिवस सातत्याने रुग्णालयांना आगी लागण्याच्या विविध घटना समोर येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे नेमके काय झाले असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.