काल भांडुपच्या ड्रीम मॉलला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच, राज्यात इतर ठिकाणीही अग्नितांडव झाल्याचे समजले आहे. मुंबई, बदलापूर आणि पुणे या शहरांत काही ठिकाणी आग लागल्याचे कळले आहे.
मुंबईच्या प्रभादेवीतील एका गोदामाला आग लागली होती. त्याबरोबरच बदलापूर परिसरातील एमआयडीसीतील एका बंद कंपनीला आग लागली, तर पुण्याती छावणी भागातील फॅशन स्ट्रीटला देखील आग लागली. या आगीत काही गाळ्यांचे नुकसान झाले.
प्रभादेवी, मुंबई
प्रभादेवी येथील एका वायरच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग बेसमेंट आणि तळ मजल्यावर लागली आहे. यावेळी अग्निशमन दलाचे १६ बंब या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करायला सुरूवात केली. अजूनही अग्निशमन दलाचे प्रयत्न चालू आहेत.
खरवाई, बदलापूर
बदलापूरच्या खरवाई एमआयडीसीत असलेल्या एका कंपनीत आग लागली. मात्र ही कंपनी गेला काही काळ बंद असल्याने, कोणतीही जिवीत हानी झाली नाही. रसायने उत्पादन करणाऱ्या या कंपनीवर, रसायने पाण्यात सोडल्याचा ठपका ठेवून प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती. त्यामुळे ही कंपनी बंद होती. या कंपनीची वीज आणि पाणी देखील तोडण्यात आले होते. असे असताना बंद कंपनीला आग कशाने लागली हो समजू शकले नाही. या कंपनीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत ही संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.
फॅशन स्ट्रीट, पुणे
पुण्याच्या कॅम्प परिसरात मोठी आग लागली. या आगीत अनेक गाळ्यांचे नुकसान झाले. या भागात कपड्यांची दुकाने आणि गोदामे असल्याने ही आग वेगाने पसरली. फॅशन स्ट्रीट आगीच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने, गाळेधारकांविरुद्ध केलेली कारवाई थंड पडली होती. या आगीत अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.