क्रिकेट खेळताना क्षेत्ररक्षण करत असताना डोक्याला चेंडू लागून एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना माटुंग्यातील दडकर मैदानात सोमवारी दुपारी घडली.
क्षेत्ररक्षण करत असताना जयेश सावला यांची पाठ दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लब मैदानावर सुरू असलेल्या सामन्याकडे होती. याच खेळाडूने मारलेला चेंडू सावला यांच्या डोक्याला कानाच्या मागील बाजूस लागला. त्यामुळे ते कोसळले. त्यांना तातडीने लायन ताराचंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे सोमवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
गुजराती कच्छी समाजाने माटुंगा येथे प्रौढ क्रिकेटपटूंची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात ५० वर्षांवरील खेळाडूंचा सहभाग होता. शहरात मैदानांची संख्या कमी असल्याने मैदानात एकाचवेळी दोन सामने सुरू होते. या मैदानात अशा प्रकारे एकावेळी दोन-तीन सामने सुरू असल्याने आधीही खेळाडू जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. ‘सावला यांना संध्याकाळी पाच वाजता आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. ईसीजीची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे आम्ही जाहीर केले. त्यानंतर आम्ही शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पोलिसांना सुपूर्द केला,’ असे सायनच्या लायन ताराचंद बापा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
शवविच्छेदनानंतर सायन हॉस्पिटलचे फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. सावला यांच्या डोक्याच्या मागील बाजूच्या हाडावर मार बसला. त्यामुळे किरकोळ रक्तस्राव झाला आणि डोक्याला फ्रॅक्चर झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘तथापि, मात्र हा हल्ला इतका गंभीर दिसत नव्हता की, की यामुळे त्वरित मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे न्यूरोजेनिक धक्क्याने हा मृत्यू झाला असावा,’ अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
तीन दिवसांत ३० टक्के पर्यटकांची मालदीवकडे पाठ!
बंदुका घेऊन तोंडावर मास्क लावून थेट चॅनलच्या स्टुडिओत घुसले आणि…
अमेरिकेत राम मंदिराचा उत्साह; राम भक्तांनी काढली शोभायात्रा
बेंगळुरूस्थित सीईओ महिलेने आपल्या मुलाला मारून टाकत आत्महत्येचा केला प्रयत्न
मज्जासंस्थेची क्रिया अचानक कमी झाल्यामुळे न्यूरोजेनिक धक्का बसतो. पाठीच्या कण्याला दुखापत, मेंदूच्या दुखापती किंवा तीव्र भावनिक तणावामुळे असे होऊ शकते. मज्जासंस्थांना धक्का बसल्यामुळे रक्तदाब कमी होऊन महत्वाच्या अवयवांना अपुरा रक्तपुरवठा होतो. फॉरेन्सिक टीमने मृत्यूचे कारण तात्पुरते पुढील अभ्यासासाठी प्रलंबित ठेवले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी कोषाध्यक्ष जगदीश आचरेकर यांनी लगतच्या ठिकाणी दोन क्रिकेट सामने आयोजित करताना खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे.