सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे रद्द केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काळा पैसा नामशेष करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, आता हा पैसा परत येईल, अशी भीती आहे,’ अशी प्रतिक्रिया शहा यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४’ मध्ये बोलताना दिली.
सन २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या निवडणूक रोखे योजनेला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात रद्दबातल ठरवले होते. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर मी कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही, परंतु निवडणूक रोखे योजना आणि काळा पैसा नष्ट करण्यासाठी ती कशी आणली गेली, याबद्दल चर्चा करण्यास तयार आहे,’ असे सांगून शहा यांनी या योजनेबाबत माहिती दिली.
‘योजना लागू होण्यापूर्वी राजकीय पक्षांना रोख रकमेतून देणग्या दिल्या जात होत्या. मात्र निवडणूक रोखे योजना सुरू झाल्यानंतर, कंपन्यांना किंवा व्यक्तींना पक्षांना देणगी देण्यासाठी निवडणूक रोखे खरेदी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे धनादेश सादर करावा लागला,’ असे त्यांनी सांगितले. ‘असा एक समज आहे की भाजप सत्तेत असल्यामुळे त्यांना निवडणूक रोखे योजनेचा फायदा झाला. हे जगातील सर्वांत मोठे खंडणी रॅकेट असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. त्यांच्यासाठी या गोष्टी कोण लिहिते माहीत नाही,’ अशी टीकाही शहा यांनी केली.
‘भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कोटी रुपये मिळाले. एकूण रोखे (सर्व पक्षांचे) २० हजार कोटी रुपयांचे होते. मग उर्वरित १४ हजार कोटी रुपयांचे रोखे कुठे गेले?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांवर अमित शहा यांनी टीकास्त्र सोडले. ‘विरोधी पक्षांना मिळालेली रक्कम लोकसभेतील त्यांच्या जागांच्या संख्येच्या प्रमाणात असमाधानकारक आहे,’ असेही ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसला १६०० कोटी रुपयांचे रोखे मिळाले, काँग्रेसला १४०० रुपये, भारत राष्ट्र समितीला १२०० कोटी रुपये तर, बिजू जनता दलाला ७७५ कोटी रुपये आणि द्रमुकला ६४९ कोटी रुपये मिळाले आहेत.
हे ही वाचा:
“पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; तेथील हिंदूही आमचे आणि मुसलमानही”
लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!
मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!
निवडणूक रोखे योजना लागू झाल्यानंतर गुप्ततेला जागा नव्हती कारण ही रक्कम दोन्ही पक्षांच्या आणि देणगीदारांच्या बँक खात्यांमध्ये दिसून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहा यांनी यावेळी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ‘जेव्हा रोख व्यवहारातून देणग्या दिल्या जातात, तेव्हा ते पक्षात १०० रुपये जमा करतात आणि एक हजार रुपये घरात ठेवतात. काँग्रेसने वर्षानुवर्षे हेच केले आहे,’ असे ते म्हणाले.