आम्हाला धमकावलेले नाही… अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दावे फेटाळले

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीने तक्रार मागे घेतल्यावरून साक्षी मलिकने केले होते आरोप

आम्हाला धमकावलेले नाही… अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दावे फेटाळले

कुस्तीपटू साक्षी मलिक आणि तिच्या पतीने एक व्हीडिओ जाहीर करत ‘भारतीय कुस्ती महासंघाच्या माजी अध्यक्षांवर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच तिच्या वडिलांनी त्यांचे आरोप मागे घेतले आहेत,’ असा आरोप केला आहे. मात्र या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी साक्षी मलिकचे हे दावे फेटाळले आहेत.

‘आपल्या कुटुंबाला कोणतीही धमकी मिळालेली नाही,’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.   साक्षी मलिक आणि तिचा कुस्तीपटू-पती सत्यवर्त कादियन यांनी जारी केलेल्या व्हिडिओत मलिकने खळबळजनक दावा केला. ‘सिंग यांच्या विरोधात तिच्या कुटुंबाला धमक्या आल्यामुळे तिच्या वडिलांनी त्यांचा जबाब मागे घेतला,’ असा दावा मलिकने केला आहे. त्यावर अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘आमच्या कुटुंबाला कोणत्याही धमक्या आलेल्या नाहीत. आमच्या मुलीवर तिचे विधान बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला, या मलिकच्या विधानाला कोणताही आधार नाही. आम्हाला जे करायचे होते ते आम्ही केले आहे. आमच्या कुटुंबाविरुद्धच्या अशा धमक्यांच्या दाव्यांमध्ये काही तथ्य नाही,” असे अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी ठामपणे सांगितले.

हे ही वाचा:

दिल्लीत कॉलेजच्या आवाराबाहेर विद्यार्थ्याची हत्या

‘या’ सीनमुळे काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी!

फिलिपाईन्सच्या बोटीला भीषण आग, १२० जणांची सुटका !

उत्तरप्रदेशात उष्णतेमुळे ७२ तासांत ५४ जण दगावले

उपरोक्त व्हिडिओमध्ये, साक्षी मलिकने खुलासा केला की अल्पवयीन कुस्तीपटूने दोनदा जबाब दिला होता. पहिल्यांदा भारतीय दंड संहितेच्या कलम १६१ अंतर्गत पोलिसांना आणि त्यानंतर, कलम १६४ अन्वये न्यायदंडाधिकार्‍यासमोर. तथापि, मलिकच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन कुस्तीपटूने तिच्या कुटुंबाला मिळालेल्या कथित धमक्यांमुळे तिचा जबाब फिरवला. अल्पवयीन कुस्तीपटूने ब्रृजभूषणसिंहविरुद्ध दाखल केलेली तक्रार फेटाळण्याची शिफारस दिल्ली पोलिसांना केली आहे. पुरेशा पुराव्यांच्या अभावी ब्रृजभूषणसिंह यांच्याविरोधातील खटले रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर ४ जुलै रोजी दिल्ली न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ब्रृजभूषण शरण सिंह यांनी एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्याची मागणी साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह भारतातील नामांकित कुस्तीपटूंनी केली आहे. सिंह यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी त्यांचे आंदोलन स्थगित केले आहे.

Exit mobile version