जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्याबद्दल त्यांनी वक्तव्य केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. देशाच्या सीमेवर सुरक्षा करणारे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत असल्याचा गंभीर आरोप फारुख अब्दुल्ला यांनी करत गरळ ओकली आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “आपल्या देशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात आहे. मग इतके मोठे सैन्याचे अस्तित्व असूनही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहेत. अंमली पदार्थांची तस्करीही केली जाते. मग मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात असूनही हे कसे होऊ शकते? सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत आहे. हे आपल्या विनाशासाठी मिळालेले आहेत,” असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
हे ही वाचा:
बिहारच्या सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू
‘माझ्या नादाला लागू नका’, माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे कळणार नाही !
माध्यमांनो, खऱ्या बातम्या द्या, नाहीतर टाळे लावू!
शेख हसिना म्हणाल्या, अमेरिकेनेच आपल्याला सत्तेवरून हटवले
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे झालेल्या चकमकीनंतर फारुख अब्दुलांचे हे वक्तव्य आले आहे. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागच्या अहलान भागात शोध मोहीम सुरू केली होती. या भागात दोन दहशतवादी लपल्याची बातमी आली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोन जवान शहीद आणि दोन जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेची कव्हर ऑर्गनायझेशन असलेल्या काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. काश्मीर टायगर्सने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत हे युद्ध सुरूच राहील.”